दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघावर पुन्हा बंदीची टांगती तलवार? | पुढारी

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघावर पुन्हा बंदीची टांगती तलवार?

जोहान्सबर्ग : पुढारी ऑनलाईन 

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघावर पुन्हा आयसीसी बंदी घालण्याती शक्यता निर्माण झाली आहे. स्पोर्ट्स कॉन्फिडरेशन आणि ऑलिंम्पिक कमिटीने दक्षिण आफ्रिका क्रिकेट असोसिएशनला निलंबित केले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर सरकारी अंकुश आला आहे. आता द. आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा दैनंदिन कारभार सरकारच्या देखरेखीखाली होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या नियमानुसार त्यांच्याशी सल्लग्नित असलेल्या कोणत्याही क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर सरकारी नियंत्रण असू शकत नाही. या नियमामुळेच आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग धोक्यात आला आहे. 

द. आफ्रिका क्रिकेट संघटनेतील प्रशासनातवर अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघावर 1970 ते 1991 पर्यंत वर्णद्वेशाच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आली होती. आता त्यांच्यावर दुसऱ्यांदा बंदीची टांगती तलवार आहे. 

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेला कोणी निलंबित केले? 

दक्षिण आफ्रिका स्पोर्ट्स कॉन्फिडरेशन आणि ऑलिंम्पिक समिती दक्षिण आफ्रिकेची ही राष्ट्रीय ऑलिंम्पिक समिती आहे. या समितीकडे राष्ट्रकुल स्पर्धांची जबाबदारी असते. याचबरोबर त्यांच्यावर विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांशी समन्वय ठेवण्याचीही जबाबदारी असते. याचबरोबर क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारित असल्याने या संस्थेला क्रीडा संघटनांची किंवा संबंधित व्यक्तीची चौकशी करण्याचाही अधिकार प्राप्त आहे. 

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेवर निलंबनाची कारवाई का? 

गेल्या एक वर्षापासून विशेषतः डिसंबर 2019 पासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेवर अनेक प्रकारचे आरोप होत होते. यात वर्णद्वेशीपणा, मानधन आणि भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झाले होते. यानंतर सर्वात पहिल्यांदा संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी थांबांग मोरोई यांची गच्छंती झाली. त्यांच्यावर अनियमिततेचे आरोप ठेवून ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर येणाऱ्या ख्रिस नेनझानी आणि जॅक्स फाऊल या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर ठिसाळ कारभार आणि चुकीची कार्यपद्धतीच्या आरोपाखाली दक्षिण आफ्रिका संघटनेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.  

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघटनेवर आयसीसीची बंदी का येऊ शकते? 

आयसीसीच्या नियमानुसार त्यांच्याशी सल्लग्नित क्रिकेट संघटनेच्या दैनंदिन कारभारात सरकारी हस्तक्षेप मान्य नाही. त्यामुळेच झिंम्बावे क्रिकेट संघटनेवर वाढत्या सरकारी हस्तक्षेपावरुन निलंबनाची करावाई करण्यात आली होती. जर झिंम्बावे क्रिकेट संघटनेवर जर कारवाई होऊ शकते तर ती दक्षिण आफ्रिकेच्या संघावरही होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेवर अशा प्रकारची बंदीची कारवाई पहिल्यांदाच होणार आहे असे नाही. त्यांच्यावर 1970 ते 1991 पर्यंत वर्णद्वेषी धोरण अवलंबल्या प्रकरणी बंदीची कारवाई करण्यात आली होती. 

Back to top button