आयपीएलमधील बाप कॅप्टन कोण, रोहित की धोनी?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबीत आजपासून (ता.19) आयपीएलचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिलाच सामना हा आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील तगड्या समजल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार होण्यासाठी एकमेकांना जोरदार टक्कर देत आहेत. आतापर्यंत मुंबई आणि चेन्नई चार वेळा अंतिम सामन्यात एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. त्यातील ३ वेळा मुंबईने सरशी मारली तर चेन्नईला एकदाच मुंबईला पाणी पाजता आले आहे.
विजेतेपदाच्या यादीत सीएसके एमआयच्या फक्त १ पाऊल मागे आहे. एमआयने आतापर्यंत ४ वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर सीएसकेने ३ वेळा विजेतेपद पटकावले आहे. आकडेवारीत कोण कोणत्या विभागात सरस आहे याचा खुलासा होईलच. याच बरोबर आयपीएलमधील प्रत्येक संघाच्या कर्णधाराचे ट्रॅक रेकॉर्ड कसे आहे याच्यावर एक नजर टाकूया.
महेंद्रसिंह धोनी ( चेन्नई सुपर किंग्ज )
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टला आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक असणाऱ्या धोनीच्या कॅप्टन्सीच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला. त्याची भारताचा कर्णधार म्हणून जशी ख्याती आहे तशीच आयपीएलमध्ये सीएसकेचा कर्णधार म्हणून ख्याती आहे. तसे पहायला गेले तर धोनीने चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे सुपरजायंट अशा दोन संघांचे नेतृत्व केले. पण, त्याच्याकडे पुण्याचे कर्णधारपद फार थोडा काळच होते. सीएसकेकडून त्याचे कर्णधार म्हणून असणारे रेकॉर्ड जबरदस्त आहे.
धोनीने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत 174 सामने खेळले आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. या 174 सामन्यांपैकी त्याने 104 सामने जिंकले आहेत तर 69 सामने गमावले आहेत, एक सामना अनिर्णित राहिला. चेन्नईच्या या कर्णधाराचे आयपीएलमधील विन पर्सेंटेज हे सर्वाधिक आहे. त्याने 60.11 टक्के सामने जिंकले आहेत. धोनीचे हे पर्सेंटेज 30 पेक्षा जास्त आयपीएल सामन्यात कर्णधार पद भुषवलेल्या कर्णधारांमध्ये सर्वोत्तम आहे.
विराट कोहली ( रॉयल चॅलेंजर बेंगलोर )
सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची आयपीएलमधील कामगिरी फलंदाज म्हणून उत्कृष्ट आहे. पण, ही उत्कृष्ट कामगिरी त्याला आयपीएल संघाचा कर्णधार म्हणून अजून पर्यंत करता आलेली नाही. त्याने आरसीबीचे 110 सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील 49 सामन्यात विजय तर 55 सामन्यात पराभव पत्करला आहे. चार सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे कोहलीचे विन पर्सेंटेज 47.16 असे साधारणच राहिले आहे. येत्या हंगामात तो आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देतो का आणि आपली आयपीएल कर्णधार म्हणून कामगिरी उंचावतो का हे पहावे लागेल.
रोहित शर्मा ( मुंबई इंडियन्स )
महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाची धुरा घेतलेल्या विराट कोहलीने भारताची विजयी घोडदौड उत्तम प्रकारे कायम राखली पण, आयपीएलमध्ये त्याला धोनीप्रमाणे यशस्वी नेतृत्व करता आले नाही. पण, भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये धोनीच्या तोडीस तोड नेतृत्व दिले. त्यांने मुंबई इंडियन्सचे 104 सामन्यात नेतृत्व केले, त्यातील 60 सामने जिंकले तर 42 सामने हरले आहेत. दोन सामने बरोबरीत सुटले. त्याचे विन पर्सेंटेज 58.65 आहे. धोनी पेक्षा रोहितचे विन पर्सेंटेज कमी असले तरी संघाला आयपीएल टायटल जिंकून देण्यात तो धोनीपेक्षा एक पाऊल पुढेच आहे. त्याने मुंबई इंडियन्सला आतापर्यंत 4 वेळा आयपीएल जिंकून दिले आहे.
दिनेश कार्तिक (कोलकाचा नाईट रायडर्स)
दिनेश कार्तिकने दोन संघांचे नेतृत्व केले आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) आणि कोलकाता नाईट राईडर्स या दोन संघांचे नेतृत्व केले. दिल्लीचे नेतृत्व करताना त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. पण, केकेआरचे नेतृत्व त्याने प्रभावीपणे केले. दोन्ही मिळून कार्तिकने 36 सामन्यात नेतृत्व केले. त्यातील 17 सामने जिंकले तर 18 सामने गमावले. एक सामना बरोबरीत सुटला. त्याचे विन पर्सेंटेज 48.61 इतके आहे. कर्णधार म्हणून ही कामगिरी साधारण म्हणून गणली जाते.
डेव्हिड वॉर्नर (सनराईजर्स हैदराबाद)
बॉल टॅम्परिंग प्रकरणी डेव्हिड वॉर्नर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्यामुळे त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. पण, या सर्वाचा त्याच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट त्याने जोमाने पुनरागमन करत आयपीएल हंगाम गाजवला होता. त्यामुळे त्याला 2020च्या आयपीएल हंगामात सनराईजर्स हैदराबादचे कर्णधारपद पुन्हा बहाल करण्यात येणार आहे.
त्याने 2015 ते 2017 दरम्यान सनराईजर्स हैदराबादचे नेतृत्व केले होते. त्याने आपल्या नेतृत्वाखाली 2016 ते आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने हैदराबादचे 45 सामन्यात नेतृत्व केले आहे. तसेच दोन सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिलचेही नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वातील एकूण 47 सामन्यापैकी 26 सामने जिंकले तर 21सामने हरले आहेत. त्याचे विन पर्सेंटेज 55.31 इतके आहे.
स्टीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स)
सध्याचा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने आयपीएलमधील तीन संघांचे नेतृत्व केले. पण, त्यातील दोन संघ आता अस्तित्वात नाहीत. त्याने पुणे वॉरियर्स, राजस्थान रॉयल्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट या संघांचे नेतृत्व केले. स्मिथलाही डेव्हिड वॉर्नर प्रमाणे बॉल टॅम्परिंग प्रकरणी 2018 चा हंगाम खेळता आला नव्हता. त्यालाही 2019 ला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वखाली खेळावे लागले होते. पण, हंगामाच्या मध्यावर पुन्हा त्याच्याकडे राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची धुरा परत आली.
आयपीएलमध्ये स्मिथने 29 सामन्यात नेतृत्व केले त्यातील 19 सामने जिंकले तर 9 सामन्यात पराभव झाला. एक सामना अनिर्णित राहिला. त्याचे विन पर्सेंटेज हे 67.85 इतके आहे. त्याचे हे पर्सेंटेज 5 सामन्यांच्या वर कर्णधारपद भुषवलेल्या कर्णधारांमध्ये सर्वोत्तम विन पर्सेंटेज आहे.
श्रेयस अय्यर ( दिल्ली कॅपिटल्स )
श्रेयस अय्यरकडे २०१८च्या आयपीएल हंगामावेळी स्पर्धेच्या मध्यावर अनपेक्षितरित्या दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार आले. दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने संघाच्या स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर कर्णधारपद सोडले होते. गंभीर नंतर २०१८ चा उरलेला आणि २०१९ चा पूर्ण हंगाम श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली २४ सामने खेळले गेले त्यातील १३ सामन्यात विजय मिळाला तर १० सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. त्याचे विन पर्सेंटेज हे ५६.२५ इतके आहे. श्रेयस अय्यरकडे कमी वयातच आयपीएल संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. याचा फायदा भारतीय संघालाही आपली नेतृत्वाची पुढची फळी मजबूत करण्यासाठी होऊ शकतो.
केएल राहुल ( किंग्ज इलेव्हन पंजाब )
ज्याप्रमाणे श्रेयस अय्यरला भारतीय संघाची भविष्यातील नेतृत्व फळी म्हणून पाहण्यात येत आहे. त्यात प्रमाणे केएल राहुल याच्याकडेही त्याच दृष्टीकोणातून बघण्यात येत आहे. केएल राहुल २०२० च्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व करणार आहे. तो रविचंद्रन अश्विनकडून पंजाबच्या नेतृत्वात धुरा आपल्या हातात घेणार आहे. रविचंद्रन अश्विन आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.