रसेल V/s. पोलार्ड  | पुढारी | पुढारी

रसेल V/s. पोलार्ड  | पुढारी

अबुधाबी : वृत्तसंस्था

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान बुधवारी होणार्‍या आयपीएल सामन्यात अनेक आक्रमक खेळाडूंची फलंदाजी पाहण्यास मिळणार आहे. यामध्ये दोन्ही संघांकडे ‘हार्डहिटर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या एकाच राष्ट्रीय संघातून खेळणार्‍या परंतु आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार्‍या केरॉन पोलार्ड आणि आंद्रे रसेल यांच्यापैकी कोण चमकणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबईला पहिल्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या सामन्याच्या माध्यमातून ते पुन्हा विजयी लय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

मुंबईने 2013 पासून कधीही आपला पहिला सामना जिंकलेला नाही. यावेळीदेखील त्यांना चेन्‍नई सुपर किंग्ज संघाने पराभूत केले. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रयत्न हा विजयाने  स्पर्धेस सुरुवात करण्याचा असणार आहे. दोन्ही संघांत मोठे फटके मारणार्‍या खेळाडूंची कमतरता नाही. शुभमन गिलचा हा तिसरा आयपीएल हंगाम असून, तो मोठे फटके मारण्यास सक्षम आहे. रोहित शर्माने निर्धारित क्रिकेटमध्ये फटकेबाजी केली आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंकडे नजरा असतील. यासोबत हार्दिक पंड्या आणि नितीश राणा यामध्येदेखील चांगली चुरस पाहायला मिळेल.

हार्दिक पंड्या फिट असून, सुनील नारायण आणि कुलदीप यादव सोबत पॅट कमिन्सचा सामना करण्यास तो सक्षम आहे. सध्या रसेल टी-20 क्रिकेटमध्ये यावेळी एक आक्रमक फलंदाज आहे. गेल्या सत्रात त्याने तब्बल 52 षटकार मारले होते. गेल्या वेळी त्याला खालच्या स्थानी फलंदाजीस पाठवले होते. त्यावेळी व्यवस्थापनावर टीका झाली होती. यावेळी तिसर्‍या स्थानी फलंदाजी करण्यास पाठविण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले आहे. कोलकाताकडे इयन मॉर्गनच्या रूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे जो दिनेश कार्तिकला मार्गदर्शन करू शकतो.

दुसरीकडे मुंबईकडे नॅथन कुल्टर नाईलसारखा अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या लढतीत चांगली सुरुवात करूनदेखील मुंबईला म्हणावी तशी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे सौरभ तिवारीऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. पहिल्या लढतीत बुमराहला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यात त्याचा चमक दाखवण्याचा प्रयत्न असेल. कृणाल पंड्या व राहुल चहर हे फिरकी गोलंदाज आणि जलदगती गोलंदाजाशिवाय मुंबईकडे पंड्या आणि केरॉन पोलार्डच्या रूपात अतिरिक्‍त मध्यमगती गोलंदाजदेखील आहेत.

संघ यातून निवडणार

कोलकाता नाईट रायडर्स :  दिनेश कार्तिक (कर्णधार), इयन मॉर्गन, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, अली खान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम माळी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाईक, टॉम बेंटोन. 

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, मिशेल मॅक्लेघन, मोहसीन खान, नॅथन कुल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, क्विंटन-डी-कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.

Back to top button