चहल आमचा हुकमी एक्‍का : कोहली | पुढारी

चहल आमचा हुकमी एक्‍का : कोहली

दुबई : वृत्तसंस्था

युजवेंद्र चहल हा प्रतिभावान खेळाडू आहे. खेळपट्टी कशीही असली तरी तो कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतो, हे पुन्हा एकदा त्याने सिद्ध केले आहे, अशा शब्दात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर(आरसीबी) संघाचा कर्णधार विराट कोहलीने चहलचे कौतुक केले आहे. चहलच्या जादुई स्पेलमुळे आरसीबीला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध शानदार विजय मिळाला.  चहलने सामन्यात 18 धावा देत तीन विकेटस् मिळवले.

सामन्यानंतर कोहली  म्हणाला, हा अतिशय चांगला सामना होता. गेल्या वर्षी निकाल आमच्या बाजूने नव्हते. आम्ही संयम कायम ठेवला आणि चहलने सामना पूर्णपणे आमच्या बाजूने झुकवला. तुमच्या विकेटस् घेण्याचे कसब असेल तर तुम्ही कुठेही विकेटस् घेऊ शकता. त्याने सामन्याचे चित्र पालटून टाकले. 

चहल म्हणाला की, जेव्हा मी पहिले षटक टाकले तेव्हा मला वाटले की विकेट टू विकेट गोलंदाजी केली पाहिजे. एक वेळ ते चांगली फलंदाजी करीत होते. मी त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मला यश मिळाले.

कोहलीने आपला पहिला सामना खेळणार्‍या देवदत्त पडिक्‍कलचेदेखील कौतुक केले. तो म्हणाला की, आम्ही अतिशय चांगली सुरुवात केली. देवदत्तने पदार्पणातच चांगली कामगिरी केली. फिंचनेदेखील चमक दाखवली.

सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, मला आठवत नाही की अशा पद्धतीने मी कधी बाद झालो होतो. चहलचे शेवटचे षटक हे टर्निंग पॉईंट होते. आम्हाला हा सामना विसरून पुढच्या सामन्यासाठी तयारी करायची आहे. मिचेल मार्शला दुखापत झाली असतानादेखील तो साहसाने मैदानात उतरला. त्याला पायावर जोर देता येत नव्हते. मला विश्‍वास आहे त्याची दुखापत फारशी गंभीर नसेल. 

विराटकडून खूप काही शिकण्यास मिळाले : देवदत्त

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाच्या विजयात मुख्य भूमिका पार पडणार्‍या देवदत्त पडिक्‍कलनुसार विराट कोहलीकडून खूप काही शिकण्यास मिळाले. मला जेव्हा पदार्पण करायचे हे कळाले तेव्हा मी खूप घाबरलो होतो. मी फलंदाजी करण्यास उतरलो तेव्हा स्तब्ध होतो. मात्र, पहिला चेंडू खेळलो तेव्हा बरे वाटले. गेल्या महिन्यापासून आम्ही सराव करीत आहोत विराटकडून मी खूप काही शिकलो.

Back to top button