IPL रोहितच्या मुंबईविरुद्ध केकेआरचा दिनेश कार्तिक का दबावात? | पुढारी

IPL रोहितच्या मुंबईविरुद्ध केकेआरचा दिनेश कार्तिक का दबावात?

अबू धाबी : पुढारी ऑनलाईन 

आयपीएल २०२० मध्ये आज ( दि. २३ ) मुंबई इंडियन्सचा मुकाबला कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. हे दोन्ही संघ समतोल असल्याने हा सामना चांगला रंगेल असा अंदाज वर्तवण्या येत आहे. पण, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकवर या सामन्यापूर्वीच प्रचंड दबाव असणार आहे. 

दिनेश कार्तिकची कारकिर्द पाहिली तर त्याला कायमच भारतीय संघात दुय्यम स्थान मिळाले आहे. महेंद्रसिंह धोनीने भारताची विकेटमागील धुरा समर्थपणे सांभाळल्यामुळे त्याला संघात एक अतिरिक्त विकेटकिपर म्हणूनच संधी मिळाली. पण, आयपीएलमध्ये त्याने आपली विकेटकिपिंगची आणि विशेष करुन फलंदाजीतील गुणवत्ता सिद्ध करुन दाखवली. त्याच जोरावर त्याला आयपीएलच्या एका संघाचे नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली आहे. 

पण, पुन्हा एकदा त्याच्यावर दबाव आला आहे. अनेक कथाकथित जाणकार माध्यमांमध्ये केकेआरच्या खांदेपालटाची चर्चा करत आहेत. जर केकेआरने २०२० च्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर केकेआरने इऑन मॉर्गनला कर्णधार करावे असा या चर्चेचा सूर आहे. त्यामुळे दबावात असलेल्या दिनेश कार्तिकला या हंगामात आपल्या संघाला चांगल्या स्थितीत ठेवण्याचे आव्हान असणार आहे. 

केकेआरच्या संघात गुणी खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याकडे स्टार ऑलराऊंडर अँद्रे रसेल आणि सलामीला येत धुवांधार फलंदाजी करणारा सुनिल नारायण आहे. याचबरोबर कर्णधार कार्तिक व्यतिरिक्त मॉर्गन, पॅट कमिन्स, कुलदीप यादव, लोकी फर्गुसन यासारखी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी नावंही आहेत. तसेच आयपीएलमधील पहिला अमेरिकन खेळाडू अली खान याचीही चर्चा सुरु आहे. पण, फक्त संघ चांगला असून चालत नाही तर कोणत्या वेळी कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानात उतरायला हवे हेही तितकेच महत्वाचे आहे. 

Back to top button