MIvsKKR : केकेआरचा ४९ धावांनी पराभव करत मुंबईने खाते उघडले | पुढारी

MIvsKKR : केकेआरचा ४९ धावांनी पराभव करत मुंबईने खाते उघडले

अबू धाबी : पुढारी ऑनलाईन 

मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा ४९ धावांनी पराभव करत यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला विजय मिळवला. मुंबईने ठेवलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला ९ बाद १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआरकडून पॅट कमिन्सने सर्वधिक ३३ तर कर्णधार दिनेश कार्तिकने ३० धावांची खेळी केली. मुंबईकडून बुमराह, बोल्ड आणि पॅटिंन्सन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतली तर पोलार्ड आणि चाहरने प्रत्येकी १ विकेट घेतली. 

मुंबई इंडियन्सने ठेवलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात म्हणावी तशी झाली नाही. शुभमन गिल आणि सुनिल नारायण हे दोन्ही सलामीवीर मुंबईच्या कसलेल्या गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसले. शुभमन गिलला तर बोल्टच्या पहिल्या षटकात एकही धाव करता आली नाही. बोल्टने च त्याला तिसऱ्या षटकात ७ धावांवर बाद केले. त्यानंतर सुनिल नारायणने एक षटकार लगावला पण, जेम्स पॅटिंन्सन ९ धावांवर त्याला बाद करत केकेआरला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. 

पण, केकेआरला या दोन धक्क्यातून सावरले ते तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार दिनेश कार्तिकने. त्याने नितीश राणाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी मिळून केकेआरला १० षटकात ७१ धावांपर्यंत पोहचवले. या दोघांनी ४६ धावांची भागिदारी रचली. केकेआरची ही जोडी जमली असे वाटत असतानाच राहुल चाहरने कार्तिकला पायचित पकडले. कार्तिक २३ चेंडूत ३० धावा करुन माघारी परतला. 

कार्तिक बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात पोलार्डने नितीश राणालाही २४ धावांवर बाद करत केकेआरला चौथा धक्का दिला. केकेआरची सर्व मदार आता मॉर्गन आणि आंद्रे रसेलवर होती. या दोघांच्या समोर ४२ चेंडूत ११४ धावा करण्याचे आव्हान होते. पण, मुंबईने केलेल्या टिच्चून माऱ्यासमोर धडाकेबाज रसेलचे काही चालले नाही. तो ११ चेंडूत ११ धावा करुन बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने रसेल पाठोपाठ इऑन मॉर्गनलाही १६ धावांवर बाद करत केकेआरच्या उरल्यासुरल्या आशा धुळीस मिळवल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी यानंतर आलेल्या फलंदाजांना फार काही करण्याची संधी दिली नाही. अपवाद फक्त पॅट कमिन्सचा राहिला त्याने बुमराहसारख्या दमदार गोलंदाजाला एकच षटकात ४ षटकार ठोकले. त्याने १२ चेंडूत ३३ धावांची आतषबाजी केली खरी पण, तोपर्यंत केकेआरच्या हातातून सामना निसटला होता. अखेर केकेआर २० षटकात ९ बाद १४६ धावांपर्यंतच पोहचू शकली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच धक्का दिला. शिवम मावीने सलामीवीर क्विंटन डिकॉकला १ धावेवर बाद केले. पण. त्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवने मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. सुर्यकुमार पाठोपाठ रोहित शर्मानेही आपला जम बसवत पॉवर प्लेमध्ये अर्धशतकी भागिदारी रचत ६ षटकात ५९ धावांपर्यंत पोहचवले. 

पॉवर प्ले नंतरही रोहित आणि सुर्यकुमारने आपली आतषबाजी सुरुच ठेवली. या दोघांनी १० षटकात मुंबईला १०० च्या जवळ नेऊन ठेवले. पण, अर्धशतकाच्या जवळ पोहचलेला सुर्यकुमार यादव धावबाद झाल्याने ही धडाकेबाज जोडी फुटली. सुर्यकुमारने २८ चेंडूत ४७ धावा केल्या. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर कर्णधार रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितच्या जोडीला आलेल्या सौरभ तिवारीने १३ चेंडूत २१ धावांची छोटी खेळी करुन बाद झाला. दरम्यान,  मुंबई इंडियन्सची धावगती मंदावली. फिरकी गोलंदाज सुनिल नारायणने टिच्चून मारा करत मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवले.

अखेरची चार षटके बाकी असताना हार्दिक पांड्याने आपला गिअर बदलला. त्याने पॅट कमिन्सने टाकलेल्या १७ व्या षटकात २ चौकर आणि १ षटकार मारत धावगती वाढवण्यास सुरुवात केली. दरम्यान, रोहित शर्मानेही मोठे फटके मारण्यास सुरुवात केली पण, शिवम मावीला षटकार मारण्याच्या नादात तो ८० धावांवर झेलबाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानावर कायरन पोलार्ड आला. त्याने आणि हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण,  चेंडू खेळताना पांड्याची बॅट स्टंपला लागल्याने तो बाद झाला. त्याने १३ चेंडूत १८ धावा केल्या.

हार्दिक बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात कायरन पोलार्डला फक्त १ चौकार मराता आला त्यामुळे मुंबईचे २०० पारचे स्वप्न भंगले. त्यांना २० षटकात ५ बाद १९५ धावांपर्यंत मजल मारता आली. केकेआरकडून शिवम मावीने ३२ धावा २ तर सुनिल नारायणने २२ धावात  १ विकेट घेतली.  

Back to top button