फिरकी गोलंदाजांमुळे पराभव : धोनी | पुढारी

फिरकी गोलंदाजांमुळे पराभव : धोनी

शारजाह : वृत्तसंस्था

चेन्‍नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या पराभवासाठी आपल्या फिरकी गोलंदाजांना जबाबदार धरले आहे. आमच्या फिरकी गोलंदाजांनी खूप जास्त फुललेन्थ चेंडू टाकत चूक केली. पीयूष चावला आणि रवींद्र जडेजा यांनी आपल्या आठ षटकांत 95 धावा दिल्या. आमच्या चुकांतून बोध घेत त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी चेंडू दूर ठेवला. याचा त्यांना फायदा झाला. आम्ही त्यांना 200 च्या आत रोखले असते तर चांगला सामना झाला असता. 

धोनी या सामन्यात स्वतः सातव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला होता. तो म्हणाला की, 14 दिवसांच्या आयसोलेशमध्ये राहिल्याचा थोडा नकारात्मक परिणाम झाला. मी बराच काळ फलंदाजी केलेली नाही. सरावाचे दिवस आयसोलेशनमध्ये गेले. चेन्‍नईच्या संघात 13 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांना एक आठवडा अधिक आयसोलेशमध्ये राहावे लागले. धोनीने आपल्याला राजस्थान रॉयल्ससारखी सुरुवात करता आली नाही व त्याने श्रेय त्यांच्या गोलंदाजाला देखील दिले. धोनी म्हणाला की, जेव्हा 217 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चांगल्या सुरुवातीची गरज असते. स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी चांगली फलंदाजी केली. मी सॅम कुरेनला संधी देऊन काही नवीन करायचा प्रयत्न करीत होतो. फाफ-डु-प्लेसिसने शेवटी चांगली खेळी केली.

रॉयल्सचा कर्णधार स्मिथने सॅमसनच्या फटकेबाजीचे कौतुक केले. तो म्हणाला की, सॅमसनने अविश्‍वसनीय खेळी केली. तो प्रत्येक चेंडूवर षटकार मारेल असे वाटत होते. मी त्याला जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा आत्मविश्‍वास दुणावेल. तो पुढेही अशीच कामगिरी करेल, असा विश्‍वास आहे. 

‘सामनावीर’ पुरस्कार मिळवलेला सॅमसन म्हणाला की, मी मोठे फटके मारण्याच्या रणनीतीने मैदानात उतरलो. मला फटके मारण्यास तसे चेंडू देखील मिळाले. मी आपल्या फिटनेस, खाणे आणि सरावावर मेहनत घेतली आहे. मला माहीत आहे की, मोठे फटके मारणे माझी ताकद आहे. त्यानुसारच मी सराव केला.

Back to top button