Dean Jones अवघ्या १८ तासांत दोन शतके ठोकणारा फलंदाज! | पुढारी

Dean Jones अवघ्या १८ तासांत दोन शतके ठोकणारा फलंदाज!

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (वय ५९) यांचे मुंबईतील हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. इंडियन प्रीमियर लीग ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने याची पुष्टी केली आहे. जोन्स आयपीएलसाठी स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचन करण्यासाठी आले होते. जोन्स यांनी ऑस्ट्रेलियाकडून ५२ कसोटी आणि १६४ एकदिवसीय सामने खेळले. ते १९८७ सालचा विश्वचषक जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वपूर्ण भाग होते. 

ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डिन जोन्स यांना एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जाते. जोन्स यांचा जन्म २४ मार्च १९६१ रोजी मेलबर्न येथे झाला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ १९८४ ला वेस्ट इंडीज दौ-यावर गेला होता, त्या संघात जोन्स यांना संधी मिळाली होती. विंडिजविरुद्ध आपल्या क्रिकेट कारकीर्दीततील पहिली कसोटी खेळताना सामन्याच्या पहिल्या डावात त्यांनी ४८ धावांची खेळी केली होती. त्यावेळी डावात जोन्सची तब्येत ठीक नव्हती परंतु तरीही त्यांनी संयमी फलंदाचीचे प्रदर्शन करून क्रिकेट रसिकांची दाद मिळविली होती. 

जोन्स यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ५२ कसोटी सामने खेळून ३,६३१ धावा केल्या. ज्यात ११ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १६४ एकदिवसीय सामने खेळून ६,०६८ धावा वसूल केल्या. यात त्यांनी ७  शतके आणि ४६ अर्धशतके ठोकली. 

१८ तासांच्या आत सलग २ शतके

डीन जोन्स यांनी १८ तासांत २ एकदिवसीय शतके ठोकण्याचा अनोखा विक्रम नोंदविला आहे. १ जानेवारी १९८७ रोजी जोन्स यांनी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १०४ धावा केल्या, तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच २ जानेवारीला त्यांनी पाकिस्तानविरुद्ध १२१ धावा केल्या. दोन्ही एकदिवसीय सामने पर्थ येथे दिवस-रात्र खेळले गेले होते.

चेन्नई येथे भारताविरुद्धच्या कसोटी जोन्स यांनी २१० धावा तडकावल्या

कसोटी कारकिर्दीतील तिसर्‍या कसोटीतच जोन्स यांनी शानदार फलंदाजी करत आपली प्रतिभा सिद्ध केली. १९८६ साली चेन्नई येथे भारताविरुद्धच्या कसोटी जोन्स यांनी २१० धावा तडकावल्या होत्या. या खेळी दरम्यान त्यांना डिहायड्रेशनचा त्रास सहन करावा लागला. ते बाद झाल्यानंतर जोन्स यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोन्स यांनी २१० धावांच्या खेळीदरम्यान ३३० चेंडूंचा सामना केला  आणि २७ चौकार तर २ षटकार ठोकले. कर्णधार ॲलन बॉर्डरबरोबर जोन्स यांनी चौथ्या विकेटसाठी १७८ धावांची शानदार भागीदारी केली. हा कसोटी सामना अखेर बरोबरीत सुटला. परंतु, जोन्स यांनी खेळलेली ती खेळी अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

१९८७ विश्वचषक स्पर्धेत संस्मरणीय कामगिरी

१९८७ च्या विश्वचषक स्पर्धेत जोन्स यांनी ३ अर्धशतके झळकावली. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्यांनी ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून ऑस्ट्रेलियाला विश्वविजेते बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या स्पर्धेत जोन्स यांनी ८ सामन्यातील ८ डावांमध्ये ३१४ धावा केल्या. 

अन् पांड्याने केल्या स्वतःच्याच दांड्या गूल(Video)

IPL: रोहित शर्माने ठोकले षटकांरांचे द्विशतक!

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर डीन जोन्स यांचे निधन

Back to top button