#ComeBackMrIPL : सुरेश रैनाला चाहत्यांचे साकडे; सीईओंचा खुलासा | पुढारी

#ComeBackMrIPL : सुरेश रैनाला चाहत्यांचे साकडे; सीईओंचा खुलासा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आपला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा (DC) सामना तब्बल ४४ धावांनी गमावला. या सामन्यात चेन्नईला १७६ धावांचे तसं अशक्यप्राय नसलेले टार्गेट चेस करता आले नाही. या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी एकच मागणी केली आहे; ती म्हणजे सुरेश रैनाला पुन्हा संघात बोलवा. चेन्नईला सलग दोन पराभवांना सामोरं जावं लागल्यानंतर #ComeBackMrIPL हा हॅशटॅग ट्रेंड झाला असून सुरेश रैनाला सीएसकेच्या चाहत्यांनी संघात परत येण्यासाठी साकडे घातले आहे. 

सुरेश रैना आयपीएल सुरू होण्यापूर्वी काही दिवस असतानाच आयपीएलमधून माघार घेत मायदेशी परतला होता. यावेळी त्याने आपण वैयक्तीक कराणाने आयपीएलमधून माघार घेत असल्याचे सांगितले होते. रैनाच्या माघार घेण्याने सीएसकेची फलंदाजी कमकूवत झाली आहे. त्यातच पहिल्या सामन्यातील हिरो अंबाती रायडू जायबंदी झाल्याने मधल्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात फाफ डुप्लेसिस (४३) वगळता कोणत्याही फलंदाजाला मोठी मजल मारता आली नाही. त्यामुळे सीएसकेला २० षटकात ७ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. दिल्ली विरुद्धचा सामना गमावल्यमुळे चेन्नईचे तीन सामन्यात सलग दोन पराभव झाले आहेत. याच कारणास्तव चेन्नईच्या चाहत्यांनी संघात सुरेश रैना कसा उपयुक्त खेळाडू होता आणि तो नसल्याने संघाच्या फलंदाजी विभागात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना सोशल मीडियावरून व्यक्त केली. 

दरम्यान, सोशल मीडियावर चाहत्यांनी रैनाला पुनरागमनाचे साकडे घातले असले तरी सीएसकेचे सीईओ केसी विश्वनाथन यांनी मात्र रैनाच्या पनुरागमनाबाबत विचार करत नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की ‘आम्ही सुरेश रैनाचा सध्या विचार करत नाही कारण त्याने स्वतःहून स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. आम्ही त्या बाबत विचार करत नाही.’ 

याच बरोबर त्यांनी ‘आम्ही नशिबवान आहोत की आम्हाला क्रिकेट जगतातील सर्वात चांगला फॅन क्लब लाभला आहे. मी त्यांना आश्वस्त करु इच्छितो की आम्ही पुन्हा जोमाने पुनरागमन करु. हा एक खेळ आहे आणि त्यात चांगले आणि वाईट दोन्ही दिवस असतात. पण, खेळाडूंना माहिती आहे की त्यांना काय करायचे आहे. फॅन्सच्या चेहऱ्यावर हास्य पुन्हा परत येणार’ असे आश्वासन सीएसकेच्या फॅन्सना दिले. 

 

Back to top button