IPL : संजू सॅमसनवरुन थरुर, गंभीर यांच्यात 'शाब्दिक देवाणघेवाण'  | पुढारी

IPL : संजू सॅमसनवरुन थरुर, गंभीर यांच्यात 'शाब्दिक देवाणघेवाण' 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आयपील २०२० च्या कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचे २२४ धावांचे आव्हान पार करत शानदार विजय मिळवला. या विजयानंतर एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या राहुल तेवतियाचे सर्वजण तोंडभरुन कौतुक करत आहेत. पण, या विजयाचा खरा पाया रचला तो ४२ चेंडूत ८५ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या संजू सॅमसनने. आता त्याच्याच खेळीवरुन भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये ट्विटरवरुन शाब्दिक देवाणघेवाण झाली. 

काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे संजू सॅमसनेचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी कायम संजू सॅमसनला जाहीर पाठिंबा दिला आहे. ते कायम संजूला भारतीय संघात स्थान मिळावे म्हणून सोशल मीडियावर आग्रही असतात. त्यांनी पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर ‘राजस्थान रॉयल्सचा काय अभुतपूर्व विजय! मी गेल्या दशकापासून संजू सॅमसनला ओळखतो आणि ज्यावेळी तो १४ वर्षाचा होता त्यावेळी मी त्याला सांगितले होते की तू एक दिवस दुसरा एमएस धोनी होणार. तो दिवस उजाडला आहे. त्याच्या गेल्या दोन दमदार आयपीएल इनिंगनंतर आता तुम्हाला कळेल की जागतिक किर्तीचा खेळाडू आला आहे.’ असे ट्विट केले. 

शशी थरुरांचे हे ट्विट रिट्विट करत पहिल्यांदा भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने त्याच्यावर कमेंट केली. त्याने ‘तो पुढचा धोनी नाही. तो एकमेवाद्वितीय संजू सॅमसन आहे. तो २०१५ पासून भारतीय संघात सगळ्या फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळायला हवा होता. कृपा करुन त्याची तुलना करु नका, जर त्याला योग्य संधी मिळाली असती तर तो आताप्रमाणेच भारतीय संघाकडून खेळला असता आणि अनेक वर्ल्डकप जिंकले असते. पण…’ अशी कमेंट करत त्याला मिळालेल्या अत्यंत मर्यादीत संधीबद्दल भाष्य केले. 

त्यानंतर भाजपचा खासदार आणि माजी कसोटीपटू गौतम गंभीरने श्रीसंतच्या सुरात सूर मिसळला आहे. त्याने शरुरांचे ट्विट रिट्विट करुन कमेंट केली की ‘संजू सॅमसनला कोणीही पुढचा धोनी होण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटचा ‘द’ संजू सॅमसन होऊ शकतो.’ अशी कमेंट करुन थरुरांच्या सॅमसनची तुलना धोनीशी करण्याच्या विधानाला विरोध दर्शवला. जरी या सर्वांमध्ये संजू सॅमसन पुढचा धोनी होणार की नाही यात मतभिन्नता असली तर त्यांच्यात संजू सॅमसनच्या उच्च प्रतीच्या कौशल्याबाबत दुमत नाही.

Back to top button