RCBvsMI : सुपर ओव्हरचा 'सुपरहिरो' सैनीमुळे आरसीबीचा विजय साकार | पुढारी

RCBvsMI : सुपर ओव्हरचा 'सुपरहिरो' सैनीमुळे आरसीबीचा विजय साकार

दुबई : पुढारी ऑनलाईन 

रॉयल चॅलेंजर बेंगलोगने मुंबई विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये ८ धावांचे लक्ष यशस्वीरित्या पार करत विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो सुपर ओव्हरमध्ये फक्त ७ धावा देणारा आरसीबीचा नवदीप सैनी. मुंबईने प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेल्या आरसीबीने सलामीवीर फिंच ( ५२ ), देवदत्त पडिक्कल ( ५४ ) डिव्हिलियर्स ( २४ चेंडूत ५५ ) यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर २०१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना खराब सुरवातीनंतरही मुंबईने २०१ धावांपर्यंत मजल मरली. यात इशान किशनच्या ५८ चेंडूत केलेल्या ९९ धावांचे मोलाचे योगदान होते. त्याला कायरन पोलार्डने २४ चेंडूत ६० धावांची धडाकेबाज खेळी करत उत्तम साथ दिली. पण, अखेर सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला. यंदाच्या आयपीएलमधील हा दुसरा सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना ठरला.  

 

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात खराब झाली. वॉशिंग्टन सुंदरने मुंबईची जान रोहित शर्माला ८ धावांवर बाद केले. त्यानंतर उडानाने सुर्यकुमार यादवला शुन्यावर बाद करून मुंबईला दुसरा धक्का दिला. या पडझडीनंतर इशान किशन आणि क्विंटन डिकॉक मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, चहलने डिकॉकला १४ धावांवर बाद करत त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले.

दरम्यान, इशान किशनने आपला जम बसवत मुंबईची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने हार्दिक पांड्याला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी ३९ धावांची भागिदारी रचली. पण, झाम्पाने पांड्याला १५ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यामुळे मुंबईची अवस्था ११.२ षटकात ४ बाद ७८ अशी झाली. दरम्यान, एकाकी झुंज देणाऱ्या इशान किशनने आपले अर्धशतक पूर्ण केले. 

मुंबईने आपले शतक १५ व्या षटकात पूर्ण केले. त्यामुळे आता त्यांना उरलेल्या ५ षटकात मुंबईला विजयासाठी ९० धावांची गरज होती. आता कायर पोलार्डने आपला गिअर बदलत फटकेबाजी सुरु केली. यामुळे आरसीबीच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण झाला. याचा फायदा घेत पोलार्डने १७ वे षटक टाकणाऱ्या झाम्पाला ३ षटकार आणि १ चौकार मारत २७ धावा वसूल केल्या. यामुळे आता टार्गेट १८ चेंडूत ५३ धावा असे आले. 

पोलार्डने आपला धडाका कायम राखत २० चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याला इशान किशननेही फटकेबाजी करत चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने सामना १२ चेंडूत ३१ धावा असा आवाक्यात आणला. परंतु १९ वे षटक टाकणाऱ्या नवदीप सैनीने टिच्चून मारा केला. पण, चौथ्या चेंडूवर किशनने षटकार मारत गणित बिघडवले. आता मुंबईला अखेरच्या षटकात विजयासाठी १९ धावांची गरज होती. अखेरचे षटक टाकणाऱ्या उडानाच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा झाल्या तर तीसऱ्या चेंडूवर किशनने शटकार मारत इक्वेशन ३ चेंडूत ११ धावा असे आणले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही षटकार मारून हे इक्वेशन २ चेंडूत ५ धावा असे आले. पण, पाचव्या चेंडूवर उडानाने किशनला ९९ धावांवर बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. किशनने ५८ चेंडूत ९९ धावांची झुंजार खेळी केली. पण त्याचे शतक फक्त १ धावेने हुकले. आता १ चेंडूवर विजयसाठी पाच आणि बरोबरीसाठी ४ धावांची गरज असताना पोलार्डने चौकार मारला आणि सामना टाय केला. 

सुपर ओव्हर

यंदाच्या आयपीएल हंगामातील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नवदीप सैनीने टाकलेल्या षटकात पोलार्डची विकेट घेत फक्त ७ धावा दिल्या. हे ८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर बेंगलोरने पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा केल्या. त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव गेला. त्यामुळे अखेरच्या ३ चेंडूवर विजयासाठी ६ धावांची गरज होती. त्यावेळी चौथ्या चेंडूवर एबीने चौकार मारत हे इक्वेशन २ चेंडूत २ धावा असे आणले. पाचव्या चेंडूवर एका धाव घेत एबीने सामना १ चेंडू १ धाव असा आणला. स्ट्राईकवर असलेल्या विराट कोहलीने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत सामना खिशात घातला. 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा सलामीवीर अॅरोन फिंचने अडखळत्या सुरुवातीनंतर चांगलीच लय पकडली. त्याने देवदत्त पडिक्कलच्या साथीने पॉवर प्लेमध्ये आरसीबीला ५९ धावांपर्यंत पोहचवले. यात फिंचचे २५ चेंडूत ४० धावांचे योगदान होते. पॉवर प्लेनंतर फिंचने आपले अर्धशतक ३१ चेंडूत पूर्ण केले. पण, अर्धशतकानंतर फिंच लगेचच बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. 

फिंच बाद झाल्यानंतर आलेल्या विराट कोहलीला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी विशेष करुन जसप्रीत बुमराहने चांगलेच बांधून ठेवले. त्यामुळे त्याला १० चेंडूत फक्त ३ धावा करता आल्या. अखेर राहुल चाहरने रोहित शर्माकरवी विराटला झेलबाद केले. विराट बाद झाला त्यावेळी आरसीबीच्या १२.२ षटकात ९२ धावा झाल्या होत्या. विराटच्या संथ खेळण्याने आरसीबीचा पॉवर प्लेमधला चांगला रनरेट मंदावला. 

विराट बाद झाल्यानंतर आलेल्या एबी डिव्हिलियर्सने पडिक्कलच्या साथीने मंदावलेला धावफलक हालता ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, सेट झालेल्या देवदत्त पडिक्कलने आपला गिअर बदलला. त्याने आक्रमक रुप धारण करत संघाला शंभरी पार करुन दिली.पडिक्कल पाठोपाठ एबी डिव्हिलियर्सनेही मोठे शॉट खेळण्यास सुरुवात केली. याच वेळी पडिक्कलने आपले अर्धशतक ३७ चेंडूत चौकार मारत पूर्ण केले.

अखेरची चार षटके राहिली असताना एबी डिव्हिलिर्सने फटकेबाजी सुरु केली. त्याने बुमराहने टाकलेल्या १७ व्या षटकात १८ धावा वसूल केल्या. पण, १८ व्या षटकात पडिक्कलने डिव्हिलियर्सची साथ सोडली. त्याला ट्रेंट बोल्टने ५४ धावांवर बाद केले. त्यानंतर डिव्हिलियर्सने आरसीबीच्या डावाची सुत्रे आपल्या हातात घेत तुफान फटकेबाजी केली. त्याने २३ चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाच टार्गेट केल्याने मुंबईची गोलंदाजी ढिली पडली. अखेरच्या षटकात डिव्हिलियर्स आणि शिवम दुबेने २० धावा वसूल करत आरसीबीला २०१ धावांपर्यत पोहचवले. शिवम दुबेने १० चेंडूत २७ धावांची स्फोटक खेळी केली. यात त्याच्या ३ षटकारांचा आणि एका चौकाराचा समावेश होता. तर डिव्हिलियर्सने २४ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली.

Back to top button