DCvsSRH : हैदराबादला अखेर विल्यमसन पावला | पुढारी

DCvsSRH : हैदराबादला अखेर विल्यमसन पावला

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन 

अखेर सनरायजर्स हैदराबादला केन विल्यमसन पावला आणि त्यांनी आपला यंदाच्या हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. हैदराबादने दिल्लीचा १५ धावांनी पराभव केला. विल्यमसनचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना आणि हैदराबादचाही हंगामातील पहिलाच विजय. या सामन्यात हैदराबादची फलंदाजी समाधानकारक झाली त्यामुळेच हैदराबादच्या तगड्या गोलांदाजीने त्यावर विजयी कळस चढवला. हैदराबादकडून राशीद खानने १४ धावात ३ तर भुवनेश्वर कुमारने २५ धावात २ बळी टीपले. तत्पूर्वी हैदराबादकडून जॉनी बेअरस्ट्रोच्या अर्धशतकी, वॉर्नरच्या ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर आणि केन विल्यमसनच्या आक्रमक २६ चेंडूत ४१ तर धावांच्या सहाय्याने हैदराबादने १६३ धावां उभारल्या. याचा पाठलाग करताना दिल्लीला ७ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

सनरायजर्स हैदराबादने ठेवलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पृथ्वी शॉला पहिल्याच षटकात २ धावांवर बाद केले. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला पण, राशीद खानने २१ चेंडूत १७ धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला बाद करत ही जोडी फोडली.

दिल्लीचे दोन फलंदाज ४२ धावांवर माघारी परतल्यानंतर धवन आणि ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, पुन्हा राशीदने दिल्लीला सेट झालेल्या धवनला ३४ धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. आता दिल्लीच्या फलंदाजीची सर्व मदार ऋषभ पंतच्या खांद्यावर आली होती. त्यानेही आपली धावगती वाढवत झुंज देण्यास सुरुवात केली. त्याला हेटमायरही चांगली साथ देत होता. या दोघांनी दिल्लीला १५ षटकात १०४ धावांपर्यंत पोहचवले. 

दिल्लीला आता विजयासाठी ३० चेंडूत ५९ धावांची गरज होती. पण, अनुभवी भुवनेश्वरने ११ चेंडूत २१ धावा करणाऱ्या हेटमायरला बाद करत ही जोडी फोडली. यानंतर पंतवर धावगती झपाट्याने वाढवण्यासाठी दबाव वाढत गेला. याच दबावात तो २८ धावांवर राशीदच्या गोलंदाजीवर झेल देऊन परतला. त्यामुळे दिल्लीला १८ चेंडूत ४४ धावांची गरज असताना फक्त मार्कस स्टॉयनिस हा एकटाच धडाकेबाज फलंदाज क्रिजवर होता. तोही ८ चेंडूत ११ धावा करुन माघारी परतला. त्यामुळे दिल्लीच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. अखेर दिल्लीला २० षटकात ७ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत पॉवर प्ले मध्ये टिच्चून मारा केला. दिल्लीला जरी पॉवर प्लेमध्ये सनरायजर्स हैदराबादचा एकही फलंदाज बाद करण्यात यश मिळाले नसले तरी त्यांनी ६ षटकात फक्त ३८ धावा देत डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रो सारख्या धडाकेबाज फलंदाजांना जखडून टाकले. 

पण, पॉवर प्लेनंतर वॉर्नर आणि बेअरस्ट्रोने धावगती वाढवत ७ व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. जम बसलेला डेव्हिड वॉर्नर आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचत होता. पण, अमित मिश्राने ४५ धावांवर खेळणाऱ्या वॉर्नरला बाद करुन १० व्या षटकात दिल्लीला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अमित मिश्रानेच मनिष पांडेला ३ धावात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत हैदराबादला दुसरा धक्का दिला. 

या दोन धक्क्यातून संघाला सावरण्याची जबाबदारी जॉनी बेअरस्ट्रोने आपल्या खांद्यावर घेतअर्धशतकी खेळी केली. त्याला हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या केन विल्यमसन यानेही येताक्षणीच आक्रमक फलंदाजी करत त्याला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत बेअरस्ट्रोने त्याची १९ व्या षटकात साथ सोडली. दरम्यान, दमदार फटकेबाजी करणाऱ्या केन विल्यमसनने संघाला १५० च्या पार पोहचवले. पण, त्याला रबाडाने ४१ धावांवर बाद केले. त्यामुळे त्याचे अर्धशतक हुकले.अखेर हैदराबादने २० षटकात ४ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली.

Back to top button