रविचंद्रन अश्विन याची वर्ल्डकपसाठी दावेदारी | पुढारी

रविचंद्रन अश्विन याची वर्ल्डकपसाठी दावेदारी

मुंबई ; वृत्तसंस्था : एकेकाळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून जवळपास हद्दपार झालेला आणि फक्त लाल चेंडूने कसोटी खेळणारा खेळाडू म्हणून शिक्का बसलेल्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने यंदाच्या आयपीएलमध्ये बॅट आणि बॉलने धुमाकूळ घातला असून आपल्या या कामगिरीमुळे तो टी-20 विश्वचषक संघात निवडीसाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला आहे.

टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 स्पर्धेला फक्त चार महिने शिल्लक आहेत. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक होणार आहे आणि विश्वचषकाची तयारी म्हणून निवडकर्त्यांच्या नजरा आयपीएलवर खिळल्या आहेत. या लीगमधील खेळाडूंची कामगिरी पाहता आगामी काळात टीम इंडियाची निवड होणार आहे. टीम इंडियाच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने या मोसमात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा खेळाडू टी-20 विश्वचषकच्या भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकतो.

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आयपीएल 2022 मध्ये खूप चर्चेत आहे. आयपीएलच्या या हंगामात रविचंद्रन अश्विन बॉलसोबतच बॅटनेही कमाल करत आहे. या सिझनमध्ये तो तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करतानाही दिसला आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात तो फिनिशरच्या भूमिकेत दिसला. अश्विनचा हा खेळ पाहता निवड समिती त्याला टी-20 विश्वचषकात संधी देण्याचा नक्कीच विचार करू शकते.

चेन्नईविरुद्ध मॅच विनिंग इनिंग

आयपीएल 2022 चा 68 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अश्विन राजस्थानच्या विजयाचा हीरो ठरला. सामन्यात अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि संघाला विजय मिळवून देऊन परतला. त्याने 173.91 च्या स्ट्राईक रेटने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 40 धावा केल्या. यावेळी त्याने 1 बळीही घेतला. अश्विनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 5 गडी राखून विजय मिळवत प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

आयपीएल-15 मध्ये केली अष्टपैलू कामगिरी

आयपीएल 2022 रविचंद्रन अश्विन याच्यासाठी आतापर्यंत चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत उत्कृष्ट ठरले आहे. या हंगामात अश्विनने लीग टप्प्यातील 14 सामन्यांमध्ये 7.14 इकॉनॉमीने धावा खर्च करून 11 विकेटस् घेतल्या आहेत. त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर या 14 सामन्यांमध्ये अश्विनने 30.50 च्या सरासरीने आणि 146.40 च्या स्ट्राईक रेटने 183 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याने अर्धशतकही केले आहे.

Back to top button