RR vs CSK : अश्विनची झुंजार खेळी; राजस्थान दुसर्‍या स्थानावर | पुढारी

RR vs CSK : अश्विनची झुंजार खेळी; राजस्थान दुसर्‍या स्थानावर

मुंबई ; वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्जच्या 151 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचे (RR vs CSK) बटलर, सॅमसंग, पडिक्कल, हेटमायर असे धुरंधर तंबूत परतले असताना अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विन याने 23 चेंडूंत 40 धावांची निर्णायक खेळी करून राजस्थानला विजयी केले. या विजयाने राजस्थान गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स संघाला मागे टाकून प्ले-ऑफ फेरीत दुसर्‍या स्थानी पोहोचले आहे. दोघांचेही समान 18 गुण झाले असले तरी सरस धावगतीचा राजस्थानला फायदा झाला.

बेब्रॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मोईन अलीच्या धडाकेबाज 93 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 6 बाद 150 धावा केल्या. हे आव्हान राजस्थानने 5 विकेट आणि 2 चेेंडू राखून पूर्ण केले. मोईन अलीचे शतक 7 धावांनी हुकले.

151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा हुकमी एक्का जोस बटलर (2) दुसर्‍याच षटकांत परतला, पण याचा त्याचा जोडीदार यशस्वी जैस्वालवर कोणताही परिणाम झाला नाही, तो बेधडक खेळत होता. पण त्याला साथ देणारा कर्णधार संजू सॅमसनही 15 धावा करून बाद झाला. पाठोपाठ देवदत्त पडिक्कलने (3) निराशा केली.

दरम्यान यशस्वीने 39 धावांत अर्धशतक गाठले. संघाचे शतक फलकावर लागल्यानंतर जैस्वाल बाद झाला. त्याने 44 चेंडूंत 59 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शिमरोन हेटमायरही (6) बाद झाला. त्यामुळे राजस्थानचा संघाची अवस्था 5 बाद 112 अशी झाली. सेट झालेला जैस्वाल 59 धावांवर बाद झाल्यानेे संघाची विजयाची आशा मावळली होती; परंतु रविचंद्रन अश्विनने रॉयल खेळी करीत राजस्थानला दुसर्‍या स्थानावर पोहोचवले. (RR vs CSK)

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का लवकर बसला. ऋतुराज गायकवाड (2) पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने राजस्थानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. मोईन अलीने ज्या प्रकारे फटकेबाजी केली होती, ती पाहून चेन्नई सुपर किंग्ज सहज दोनशे पार जाईल असे वाटत होते. पण, पहिल्या 6 षटकांत 75 धावा देणार्‍या राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सीएसकेला धक्के देताना त्यांचा धावांचा वेग संथ केला.

प्रसिद्ध कृष्णा (18 धावा), आर. अश्विन (15) आणि ट्रेंट बोल्ट (26) धावा अशा तीन षटकांत अलीने वादळी खेळी केली. अलीने 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएल 2022मधीले हे दुसरे जलद चेन्नईने पहिल्या 6 षटकांत 1 बाद 75 धावा केल्या. पण, त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले. आर. अश्विनने अली व कॉवने यांची 39 चेंडूंत 83 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. कॉनवे 16 धावांवर बाद झाला. त्यानंतर चेन्नईने 10 धावांत तीन फलंदाज गमावले.

धोनी व अलीने 52 चेंडूंत 51 धावांची भागीदारी केली. चहलने 19व्या षटकात चतुराईने धोनीला (26) बाद केले. 20व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅकॉयने सेट फलंदाज अलीला बाद केले. अलीने 57 चेंडूंत 13 चौकार व 3 षटकारांसह 93 धावा केल्या. चेन्नईला 6 बाद 150 धावाच करता आल्या. चहल व मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.

सीएसके फॅन्ससाठी खूशखबर… महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षीही खेळणार (RR vs CSK)

चेन्नई सुपर किंग्जच्या शुक्रवारच्या शेवटच्या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुढच्या हंगामात दिसणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, या प्रश्नाचे उत्तर खुद्द महेंद्रसिंग धोनी यानेच दिले आहे. मी पुढच्या हंगामातही सामना खेळेल असे माहीने सांगितलं आहे. शेवटच्या सामन्यामध्ये नाणेफेक झाल्यानंतर धोनीने त्याच्या निवृत्तीवर भाष्य केले. चेन्नईमध्ये न खेळताच धन्यवाद देण चुक ठरेल. मुंबई हे असे ठिकाण आहे, जिथे मला मोठे प्रेम मिळाले.

मात्र चेन्नईच्या चाहत्यांसाठी हे चांगले नसेल. पुढील वर्षी टीम प्रवास करेल. त्यामुळे जेथे जेथे आम्ही सामना खेळायला जाऊ, त्या सर्वच ठिकाणांना धन्यवाद केल्यासारखे होईल. माझे हे शेवटचे वर्ष असेल किंवा नसेल हे सांगणे कठीण आहे. आपण भविष्यवाणी करू शकत नाही. मात्र पुढच्या वर्षी आणखी मजबुतीने परतण्याचा मी प्रयत्न करेल, असे महेंद्रसिंग धोनी म्हणाला.

Back to top button