DC vs MI : दिल्‍लीची किल्‍ली मुंबईच्या हातात | पुढारी

DC vs MI : दिल्‍लीची किल्‍ली मुंबईच्या हातात

मुंबई ; वृत्तसंस्था : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने शेवटचा साखळी सामना जिंकला आणि 16 गुणांसह चौथे स्थान मिळवले. विराट कोहलीच्या जोरावर मिळवलेल्या या विजयासह त्यांनी आपले प्ले ऑफचे आव्हान जिवंत ठेवले, पण पुढची फेरी गाठणे हे पूर्णपणे त्यांच्या हातात नाही. दिल्लीच्या संघाचा सध्या एक सामना शिल्लक आहे. त्यांचा नेट रनरेटही जास्त आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने दिल्लीला (DC vs MI) पराभूत केले तरच बेंगलोरची प्ले ऑफमधील जागा निश्‍चित होईल. अशा परिस्थितीत बेंगलोरचा संघ या सामन्यात मुंबईला पाठिंबा देणार असून रोहित शर्मा नक्‍कीच एक दमदार खेळी करेल, असे आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस म्हणाला.

विराट माजी कर्णधार असलेल्या आरसीबी संघाचे सध्या 14 सामन्यांत 16 गुण आहेत, पण त्यांचा नेट रनरेट -0.253 आहे. हीच त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. कारण आता यंदाच्या साखळी फेरीच्या सामन्यांपैकी केवळ दिल्लीचा संघ आरसीबी एवढे गुण मिळवू शकतो. दिल्ली कॅपिटल्स सध्या 13 सामन्यांत 14 गुणांवर आहे. त्यांचा नेट रनरेट +0.255 इतका आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाने त्यांना पराभूत केले, तरच आरसीबीला पुढील फेरीचे तिकीट मिळेल, पण दिल्लीचा संघ जिंकला तर आरसीबी थेट स्पर्धेबाहेर जाईल.

स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सचा (DC vs MI) हा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात ते काही प्रयोग करून युवा खेळाडूंना संधी देतात का ते पाहावे लागेल. विशेषत: अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून खेळताना पाहण्याची चाहत्यांना इच्छा आहे. मुंबईकडे गमावण्यासारखे काहीही नसले तरी दिल्‍लीला मात्र कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागणार आहे. त्यांच्यासाठी जिंकलो तर आत हरलो तर बाहेर अशी परिस्थिती आहे.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, बासिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, तिलक वर्मा, संजय यादव, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, आर्यन जुयाल, फॅबियन एलन.

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रिच नॉर्किया, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी एनगिडी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल.

मुंबई इंडियन्सला पाठिंबा देणार : फाफ डू प्लेसिस

मुंबई : आजचा सामना जिंकणे ही खूपच आनंददायी गोष्ट आहे. शेवटचा साखळी सामना जिंकणे हे नेहमीच महत्त्वाचे असते. एक संघ म्हणून तुम्ही किती चांगले आहात हे यातून स्पष्ट होते. गुजरात विरुद्धच्या सामन्यातील चांगली गोष्ट म्हणजे आम्ही सांघिकद‍ृष्ट्या खूप चांगले खेळलो. सामन्यावर आमचे चांगले नियंत्रण होते.

आज जिंकलो असलो तरी दिल्ली-मुंबई सामन्यावर आमचे भवितव्य अवलंबून आहे. एक-दोन खराब सामन्यांमुळे आम्ही अशा परिस्थितीत अडकलो आहोत. त्या सामन्यात आम्ही मुंबईला पाठिंबा देणार हे नक्‍की आहे. तसेच, रोहित शर्मा त्या दिवशी मोठी खेळी करेल, असा मला विश्‍वास आहे, अशी मिश्कील पण महत्त्वाची प्रतिक्रिया डू प्लेसिसने दिली.

विराटच्या दमदार खेळीमुळे मी खूपच खूश आहे. तो नेटस्मध्ये सराव करताना प्रचंड मेहनत घेत होता. त्यामुळे सामन्यात त्याची फलंदाजी पाहून मला मजा आली. तो जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो एकहाती सामने जिंकून देऊ शकतो हे सार्‍यांनाच माहिती आहे. त्यामुळे अशा वेळी त्याच्याबरोबर फलंदाजी करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते, असे डू प्लेसिस म्हणाला.

Back to top button