रिंकू सिंग नोबॉलवर बाद झाला होता? | पुढारी

रिंकू सिंग नोबॉलवर बाद झाला होता?

नवी मुंबई ; वृत्तसंस्था : लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला बुधवारचा सामना हा इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील सर्वात थरारक सामना झाला. रिंकू सिंग याने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करून विजयाचा घास केकेआरच्या तोंडापर्यंत नेला होता, परंतु एव्हिन लुईसच्या अफलातून कॅचने त्याची चव त्यांना चाखता आली नाही. मार्कस स्टॉयनिसने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर एव्हिन लुईसने अफलातून झेल घेतला. पण, स्टॉयनिसने टाकलेला तो चेंडू नो बॉल असल्याचा दावा चाहते करत आहेत.

लोकेश राहुल व क्विंटन डी कॉक या जोडीने 20 षटकांत 210 धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने एकही विकेट न गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. क्विंटन 70 चेंडूंत 10 चौकार व 10 षटकारांसह 140 धावांवर, तर लोकेश 51 चेंडूंत 68 धावांवर नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात सुनील नरीन व रिंकू सिंग यांची तुफान फटकेबाजी करत केकआरला आशेचा किरण दाखवणारी ठरली. या दोघांनी 19 चेंडूंत 58 धावा कुटल्या. अखेरच्या षटकात 21 धावा असताना रिंकूने 4, 6, 6, 2 अशी सुरुवात केली. 2 चेंडूंत 3 धावा हव्या असताना रिंकूने जोरदार फटका मारला आणि एव्हिन लुईसने एका हाताने तितक्याच चतुराईने तो टिपला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरावा, असा हा झेल होता, पण हा नोबॉल असल्याचा दावा चाहते करीत आहेत.

काय आहे प्रकरण

लखनौ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करताना 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताच्या संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती. मार्कस स्टॉइनिस शेवटचे षटक टाकत होता आणि रिंकू सिंगने पहिल्या चार चेंडूत 18 धावा केल्या. आता कोलकाताला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूत तीन धावांची गरज होती. षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिंकूने कव्हरच्या दिशेने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि एविन लुईसने अप्रतिम झेल घेत त्याला बाद केले. आता कोलकाताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, पण स्टॉइनिसने नवा फलंदाज उमेश यादवला क्लीन बोल्ड केले. यासह लखनौने दोन धावांनी सामना जिंकला.

आता अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे की रिंकू ज्या चेंडूवर आऊट झाला होता. तो नो बॉल होता. सोशल मीडियावर या चेंडूचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले जात आहेत, ज्यामध्ये हे प्रकरण अगदी जवळचे दिसत आहे. दरम्यान, एका यूजरने असेही लिहिले की, जर असे होत असेल तर ही मोठी चूक आहे. या नो बॉलमुळे सामन्याचा निकाल आणि प्लेऑफचे समीकरण बदलू शकले असते. प्रत्येक विकेटनंतर पंचांनी नो बॉल तपासावेत.

Back to top button