RCB vs GT : आरसीबीचे आव्हान जिवंत | पुढारी

RCB vs GT : आरसीबीचे आव्हान जिवंत

मुंबई ; वृत्तसंस्था : प्ले ऑफ फेरीत स्थान मिळवण्याचे आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने (RCB vs GT) टेबल टॉपर गुजरात टायटन्सवर 8 विकेट आणि 8 चेंडू राखून विजय मिळवला. 73 धावा करणारा विराट कोहली हा या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने कर्णधार ड्यू प्लेसिससोबत 115 धावांची सलामी देत विजयाचा पाया घातला. या विजयामुळे आरसीबीचे एकूण 16 गुण झाले असून ते चौथ्या क्रमाकांवर आहेत. प्ले ऑफमध्ये टिकून राहायचे असेल तर आरसीबीला आता दिल्लीच्या पराभवाची आणि मुंबईच्या विजयाची प्रार्थना करावी लागेल. जर मुंबईविरुद्ध दिल्ली जिंकली तर त्यांचेही 16 गुण होतील; परंतु ते सरस धावगतीच्या जोरावर आरसीबीच्या पुढे जातील.

आयपीएलमधील आपला शेवटचा लीग सामना खेळणार्‍या गुजरात टायटन्सच्या 168 धावांचे आव्हान पेलताना विराट कोहली आणि कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. विशेषतः विराटचा आक्रमकपणा त्याच्या बॅट आणि देहबोलीवरून जास्तच जाणवत होता. त्याने 33 चेंडूंत अर्धशतक गाठले. बाराव्या षटकांत संघाची शंभरी झाली.

या हंगामात दोघांची दुसर्‍यांदा शतकी भागीदारी ठरली. या दरम्यान कोहलीने आरसीबीकडून खेळताना सात हजार धावांचा टप्पा ओलांडला. शेवटी ही जोडी फोडण्यात राशिद खानला यश आलेे. त्याने कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसला (44) हार्दिक पंड्याकरवी झेलबाद केले. त्याच्या जागी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने हार्दिक पंड्यावर हल्ला चढवला. पंड्याच्या या षटकांत 18 धावा गेल्या.

विराटने दुसर्‍या बाजूने रशिदला लक्ष्य करीत षटकार ठोकला, पण त्याच षटकांत तो फसला आणि यष्टिचित झाला. त्याने 53 चेंडूंत 73 धावा केल्या. यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यानंतर मॅक्सवेलने फक्त 18 चेंडूंत 40 धावांचा पाऊस पाडून विजयी लक्ष्य गाठले.

तत्पूर्वी, प्ले ऑफमध्ये 20 गुणांसह आधीच स्थान पक्के केलेल्या गुजरात टायटन्सने वानखेेडेची अलिखित परंपरा मोडत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसल्याने आपल्या संघाला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार रहावे, यासाठी कर्णधार हार्दिक पंड्याने हा प्रयोग केला. पण, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. हार्दिक व डेव्हिड मिलर यांची अर्धशतकी भागीदारी आणि हार्दिक व राशिद यांनी 15 चेंडूंत 35 धावांची भागीदारीच्या जोरावर गुजरातने 5 बाद 168 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.

वेडचा वेडेपणा.. हेल्मेट फेकले, बॅट आपटली (RCB vs GT)

गुजरात टायटन्सचा मॅथ्यू वेड आक्रमकपणे खेळत होता. मात्र, ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर 16 धावांवर असताना तो पायचित झाला. आरसीबीच्या खेळाडूंनी अपिल केल्यानंतर त्याला पंचाने बाद दिले. त्यानंतर लगेच आक्षेप घेत मॅथ्यू वेडने डीआरएस घेतला. मात्र रिव्ह्यूमध्ये तो पायचित झाल्याचे स्पष्ट झाले. पंचाच्या या निर्णयावर मॅथ्यू वेड असमाधानी दिसला. चेेंडूचा त्याच्या बॅटला स्पर्श झाल्याचे दिसत होते; परंतु स्निकोमीटरमध्ये रेषा सरळ उमटत होती.

आपल्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मत व्यक्त करत मॅथ्यूने मैदानावरच रोष व्यक्त केला. विराट कोहलीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर मॅथ्यू वेडने आपला राग काढला. त्याने ड्रेसिंग रूममध्ये हेल्मेट फेकून दिले. तसेच त्याने खुर्चीवर जोरजोरात बॅट आदळली.

Back to top button