आरसीबीचे टार्गेट ‘प्ले ऑफ’ | पुढारी | पुढारी

आरसीबीचे टार्गेट ‘प्ले ऑफ’ | पुढारी

शारजाह : वृत्तसंस्था

सलग दोन सामन्यांत पराभूत झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा सामना आज सनरायजर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. या सामन्यात बेंगलोरचा प्रयत्न विजय मिळवत ‘प्ले ऑफ’मधील आपली जागा निश्चित करण्याचा असेल. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या बेंगलोरसाठी हे सोपे नसेल. कारण, सनरायजर्स हैदराबाद संघ देखील ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीत आहे आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवल्याने हैदराबादचा आत्मविश्वास दुणावला आहे.

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज हा एकमात्र संघ आहे जो ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र, त्यांनी गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत केले. त्यांच्या या विजयाने अनेकांची ‘प्ले ऑफ’ची गणिते बिघडली आहेत. आतापर्यंत फक्त मुंबई इंडियन्सचा संघ ‘प्ले ऑफ’मध्ये जागा निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. चेन्नई सोडून सहा संघ ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीत आहेत. यामध्ये आरसीबी आणि सनरायजर्स यांचा देखील समावेश आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्याकडून सामने गमाविल्यानंतर देखील आरसीबीच्या संघाची स्थिती हैदराबादपेक्षा चांगली आहे. आपले आगामी सामने गमावले तरीही आरसीबीचे 14 गुण राहतील आणि त्यावेळी चांगल्या रनरेटच्या आधारे ते पात्रता मिळवू शकतील; पण त्यासाठी त्यांना अन्य सामन्यांच्या निकालावर लक्ष ठेवावे लागेल. शेवटच्या दोन सामन्यांत पराभूत झाल्यास त्याचा परिणाम आरसीबीच्या रनरेटवर होईल आणि त्यामुळे ते बाहेरदेखील पडू शकतात. सनरायजर्सचे आतापर्यंत 12 सामन्यांत 10 गुण आहेत. त्यांना ‘प्ले ऑफ’मध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. सनरायजर्स संघाला आरसीबीनंतर मुंबई इंडियन्सचा सामना करायचा आहे. या दोन्ही सामन्यांत विजय मिळवूनदेखील आरसीबी, दिल्ली (दोन्ही 14 गुण) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (12 गुण) हे संघ 16 गुणांपर्यंत पोहोचतात का यावर लक्ष ठेवावे लागेल. अशा स्थितीत सनरायजर्स चांगल्या रन रेटच्या आधारे ‘प्ले ऑफ’मध्ये पोहोचू शकतो.

Back to top button