‘मी निवृत्त’ म्हणत २५ वर्षाच्या PV सिंधूचा सर्वांना धक्का

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सोशल मीडियावर मी निवृत्त होत आहे असे मोठ्या अक्षरात लिहीत केलेल्या पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला. अवघ्या २५ वर्षाच्या या बॅडमिंटनपटूने निवृत्ती घेण्याची ही वेळ नाही अशीच भावना सर्व क्रीडा प्रेमींची आहे. पण, सिंधूने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंवरुन ठसठसशीत अक्षरात मी निवृत्त होत आहे (आय रिटायर) असे लिहिले. डेन्मार्क ओपन ही आपली अखेरची स्पर्धा होती, असेही ती म्हणते.
असं काय झालं की सिंधूने अचानक निवृत्ती घेतली. हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. पण, ज्यांनी सिंधूची पूर्ण पोस्ट वाचली त्यांनी सिंधूच्या या निवृत्तीचे अभिनंदनच केले असणार. कारण तिने बॅडमिंटनला अलविदा केलेले नाही तर तिने कोरोनामुळे तयार झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणाला निवृत्त केले आहे. ती नव्या जोमाने, नव्या झुंजार वृत्तीने आशिया ओपनसाठी पुन्हा एखदा कोर्टवर उतरणार आहे. ती कोरोनाच्या भयाला निवृत्त करणार आहे आणि आपणही योग्य ती काळजी घेऊन जगभरातून कोरोना हद्दपार करावा अशी तिची अपेक्षा आहे.