DCvsRCB :क्वालिफायर दिल्ली आणि मुंबईतच | पुढारी

DCvsRCB :क्वालिफायर दिल्ली आणि मुंबईतच

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन 

दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेले १५३ धावांचे आव्हान ६ फलंदाज राखून पार केले. या विजयाबरोबच दिल्लीने १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेत क्वालिफायर सामन्यासाठीचा आपला प्रवेश निश्चित केला. दिल्लीकडून अजिंक्य राहणे ( ६० ) आणि शिखर धवन ( ५४ ) यांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागिदारी रचत दिल्लीचा विजय निश्चित केला. आता दिल्ली आणि मुंबईत पहिला क्वालिफायर सामना ५ तारखेला दुबईत रंगणार आहे. हा सामना जिंकणारा थेट फायनलमध्ये जाणार आहे.  

आरसीबीच्या १५३ धावांचे आव्हान पार करताना १९ धावांवर दिल्लीला पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने पृथ्वी शॉचा ९ धावांवर त्रिफळा उडवला. पण, त्यानंतर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेने दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागिदारी रचली. या दोघांनी दिल्लीला १० व्या षटकापर्यंत ८१ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, शिखर धवन आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. 

धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, शाहबाज अहमदने त्याला ५४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शिखर आणि अजिंक्यने दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागिदारी रचत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. शिखर बाद झाल्यानंतर रहाणेने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्यानेही ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला १५ व्या षटकात १२१ धावांपर्यंत पोहचवले. 

दिल्लीला विजयसाठी ३० चेंडूत ३२ धावांची गरज होती. पण, रहाणेला साथ देणारा कर्णधार श्रेयस अय्यर ७ धावा करुन बाद झाला. दरम्यान, सामना बॉल टू रन असा आला होता. दिल्लीला विजयसाठी आता १८ चेंडूत १९ धावांची गरज होती. पण, ४५ चेंडूत ६० धावा करणारा अजिंक्य रहाणे सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला. आता क्रिजवर पंत आणि  मार्कस स्टॉइनिस हे नवीन फलंदाज होते. 

पाठोपाठ दोन विकेट पडल्याने दिल्लीची धावगती थोडी मंदावली. आता त्यांना विजयसाठी १२ चेंडूत १५ धावांची गरज होती. दरम्यान, सिराज टाकत असलेल्या १९ व्या षटकात स्टॉइनिसने षटकार मारत हे टार्गेट सोपे केले. दिल्लीला विजयसाठी १० चेंडूत ७ धावांची गरज असताना सिराजने वाईड बॉल टाकून दिल्लीला फुकटची एक धाव दिली. त्यानंतर स्टॉइनिस आणि पंतने हे आव्हान १९ व्या षटकात पार करत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. या विजयाबरोबरच पहिली क्वॉलिफायर ही मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल हे निश्चित झाले. 

आरसीबीकडून शाहबाज अहमदने २६ धावात २ तर मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेत दिल्लीला टेन्शन देण्याचा प्रयत्न केला. आरसीबीचा हुकमी एक्का यझुवेंद्र चहलला आज एकही विकेट मिळाली नाही. 

तत्पूर्वी, आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण, रबाडाने जॉश फिलिपेला १२ धावांवर बाद करत त्यांना पहिला धक्का दिला. त्यानंतर मात्र देवदत्त पडिक्कल आणि कर्णधार विराट कोहलीने आठव्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. दरम्यान, १० धावांवर असताना विराट कोहलीला नॉर्खियाने जीवनदान दिले. पण, त्याला या जीवनदानाचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. तो २९ धावांवर बाद झाला. दरम्यान, देवदत्त पडिक्कलने हंगामातले आपले ५ वे अर्धशतक झळकावले. 

पण, त्याच्या अर्धशतकाचा आनंद फार काळ टिकला नाही. नॉर्खियाने त्रिफळा उडवत त्याची ही खेळी ५० धावातच रोखली. नॉर्खियाने पाठोपाठ ख्रिस मॉरिसलाही बाद करत आरसीबीची अवस्था १६ षटकात ४ बाद ११२ धावा अशी केली. यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि शिवम दुबेने आक्रमक फटके मारत आरसीबीला १५० च्या जवळ आणले. मात्र अखेरची दोन षटके राहिली असताना रबाडाने दुबेला ( १७) बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात २१ चेंडूत ३५ धावा करणारा डिव्हिलियर्सही धावबाद झाला. त्यानंतर उडानाही ४ धावांची भर घालून माघारी परतला यामुळे आरसीबीला २० षटकात ७ फलंदाजांच्या मोबदल्यात १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली.  

दिल्लीकडून नॉर्खियाने ३३ धावात ३, रबाडाने ३० धावात २ तर आर. अश्विनने फक्त १८ धावा देत १ विकेट घेतली. 

Back to top button