मुंबईचा प्रतिस्पर्धी आज ठरणार | पुढारी | पुढारी

मुंबईचा प्रतिस्पर्धी आज ठरणार | पुढारी

अबुधाबी : वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) योग्यवेळी सूर गवसलेला सनरायजर्स हैदराबादचा संघ उद्या (रविवार) स्पर्धेच्या दुसर्‍या क्वॉलिफायर लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांचे पारडे जड असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ येत्या मंगळवारी (10 नोव्हेंबर) होणार्‍या अंतिम लढतीत मुंबईशी भिडणार आहे. 

सनरायजर्स हैदराबादसाठी मागील चारही सामने जिंकू किंवा मरू अशा पद्धतीचे होते आणि या संघाने या सर्व सामन्यांत विजयांची नोंद केली. त्याचवेळी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करणार्‍या दिल्ली कॅपिटल्सचा सूर स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचता-पोहोचता काहीसा हरवलेला दिसत आहे. 

सुरुवातीच्या टप्प्यात सुमार कामगिरी करणार्‍या हैदराबाद संघाच्या पुनरागमनाचे सर्व श्रेय कर्णधार डेव्हिड वॉर्नरला जाते. त्याने आपल्या खेळाडूंचा योग्य वापर केला. दुसर्‍या बाजूला सुरुवातीच्या नऊपैकी सात सामन्यांत विजयाची नोंद करणार्‍या दिल्ली कॅपिटल्सच्या मागील सहापैकी पाच सामन्यांतील पराभवामुळे कर्णधार श्रेयस अय्यरच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे. युवा कर्णधार अय्यर स्पर्धेच्या 13व्या हंगामात संघाला पहिल्यांदा अंतिम लढतीसाठी पात्र ठरविण्यास उत्सुक असताना, वॉर्नर 2016च्या यशाची पुनरावृत्ती करून संघाला दुसर्‍यांदा विजेता बनविण्यासाठी आतुर असेल. वॉर्नरला पुढील दोन्ही सामन्यांत संघाला जिंकून देण्यात यश आले, तर स्पर्धेत सर्वांत कमी अनुभव असलेल्या खेळाडूंच्या साथीत विजयाची नोंद करण्याचा बहुमान त्याच्या शिरपेचात खोवला जाईल. 

आघाडीच्या फलंदाजांचे अपयश ही दिल्ली संघासाठी सर्वाधिक चिंतेची बाब बनली आहे. शिखर धवनने (15 सामन्यांत 525 धावा) एकूणच चांगली कामगिरी केली आहे. मात्र, मागील काही सामन्यांत मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले आहे. युवा खेळाडू पृथ्वी शॉ याला उत्कृष्ट जलदगती गोलंदाजांचा सामना करणे कठीण जात आहे, तर अनुभवी अजिंक्य रहाणेने आतापर्यंत केवळ एका सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. सलामी फलंदाज खाते न उघडताच बाद होत असल्याने संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंगही हैराण आहेत. 

मुंबई इंडियनविरुद्धच्या पहिल्या क्वॉलिफायर लढतीचा अपवाद वगळता दिल्लीच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे. कागिसो रबाडा (25 बळी), एनरिक नॉर्न्जे (20) आणि रविचंद्रन अश्विन (13) यांनी अधिकांश सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 

सनरायजर्सच्या फलंदाजांना मागील काही सामन्यांत चांगला सूर गवसला आहे. गोलंदाजीमध्ये संदीप शर्मा, जेसन होल्डर, शाहबाज नदीम, टी. नटराजन आणि राशिद खान असे दर्जेदार कामगिरी करणारे गोलंदाज आहेत. संदीपने पॉवर प्लेमध्ये आणि नटराजनने अंतिम षटकांत शानदार कामगिरी नोंदविली आहे. मधल्या षटकांमध्ये राशिद अतिशय उपयुक्त ठरला आहे. मधल्या फळीतील फलंदाजी बहरल्यास हैदराबादचा संघ भक्कम ठरणार आहे. 

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस् स्टोइनिस, संदीप लामिछाने, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, अ‍ॅलेक्स केरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा, एनरिक नॉर्त्जे, डॅनियल सॅम्स.

•सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशीद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बावनका संदीप, संजय यादव, फॅबियन अ‍ॅलन, पृथ्वी राज यरा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी. नटराजन, बसिल थम्पी.

पराभवासाठी फलंदाज जबाबदार : कोहली

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा कर्णधार विराट कोहली याने आयपीएलच्या एलिमिनेटर लढत सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवासाठी फलंदाजांना जबाबदार ठरविताना, आमचे फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव बनविण्यात आणि पुरेशी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट केले. हैदराबादविरुद्ध आम्ही थोड्या फरकाने पराभूत झालो. जर आम्ही केन विलियम्सला बाद केले असते, तर निकाल वेगळा लागला असता, असेही तो म्हणाला.

आम्ही कौशल्याचा वापर केला : होल्डर

आयपीएलच्या एलिमिनिटेर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरवर विजय मिळविल्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा गोलंदाज जेसन होल्डर याने या लढतीत आम्ही कौशल्याचा योग्य वापर केल्याचे नमूद करताना संघातील गोलंदाजांची स्तुती केली. आमच्या गोलंदाजांनी रणनीतीनुसार मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यश मिळविले. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या खेळाडूंनी पुढाकार घेत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचेही तो म्हणाला.

Back to top button