अनिल कुंबळेंच्या शिफारसीनंतर भारताची कसोटी रँगिंमध्ये घसरण | पुढारी

अनिल कुंबळेंच्या शिफारसीनंतर भारताची कसोटी रँगिंमध्ये घसरण

दुबई : पुढारी ऑनलाईन 

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्यापूर्वीच कांगारूंनी भारताला धक्का दिला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे गुण ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त असूनही ते अव्वल स्थानावर पोहचले आहेत तर भारत दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. याला आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपमधील नियमांमध्ये केलेले बदल कारणीभूत आहेत. आयसीसीने गुरुवारी टेस्ट चॅम्पियनशिपमधील अंतिम संघ निवडण्यासाठी प्रत्येक संघाने मिळवलेल्या गुणांची टक्केवारी काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. यानंतर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये बदल झाले. 

हा निर्णय अनिल कुंबळेंच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समिती शिफारस केल्यानंतर घेण्यात आला. यामुळे आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये बदल झाले. ३ कसोटी मालिका खेळून २९६ गुण मिळवणारा ऑस्ट्रेलिया संघ रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहचला. तर ४ कसोटी मालिका खेळत ३६० गुण मिळवणारा भारत दुसऱ्या स्थानावर घसरला. ऑस्ट्रेलियाची गुणांची टक्केवारी ही ८२.२ इतकी आहे. तर भारताची गुणांची टक्केवारी ही ७५ टक्के इतकी होती. 

भारतानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर विराजमान आहेत. इंग्लंडची गुणांची टक्केवारी ६०.८ टक्के आहे तर न्यूझीलंडची गुणांची टक्केवारी ५०.०  टक्के आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत प्रेस रिलीजमध्ये ‘आयसीसीच्या बोर्डाने क्रिकेट समितीची शिफारस मान्य केली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक कसोटी मालिका प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे चॅम्पियनशिपचे काही नियम बदलण्याची गरज होती.’ असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. 

या नव्या बदलाबाबत आसीसीचे सीईओ मनू सावनी म्हणाले की ‘क्रिकेट समिती आणि सीईओ समिती या दोघांनीही जेवढे सामने झाले आहेत त्यांच्यावर रँकिंग ठरवण्यास अनुकूलता दर्शवली. यामुळे ज्यांचे कोरोनामुळे सामने झाले नाही त्यांना याचा फटका बसू नये यासाठी हा बदल करण्यात आला.’ ते पुढे म्हणाले ‘आम्ही सर्व पर्याय चाचपून पाहिले. पण, आमच्या सदस्यांनी आपण ठरल्या प्रमाणे पुढील वर्षाच्या जूनमध्ये पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल खेळवण्यात यावी याला पसंती दिली.’

Back to top button