रोहितच्या गैरहजेरीने टीम इंडियाचे कॉम्बिनेशन बिघडणार?  | पुढारी

रोहितच्या गैरहजेरीने टीम इंडियाचे कॉम्बिनेशन बिघडणार? 

अनिरुद्ध संकपाळ : पुढारी ऑनलाईन 

कोरोनामुळे गेली सात-आठ महिने क्रिकेट चाहत्यांनी मेन इन ब्ल्यूंना मैदानावर पाहिलं नव्हतं. पण, अखेर  कोरोनाची भीती बाजूला ठेऊन मेन इन ब्लू पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. या दौऱ्याची सुरुवात ही वनडे मालिकेने होणार आहे. पहिला वनडे सामना शुक्रवारी सिडनीवर रंगणार आहे. या मालिकेद्वारे आयसीसी रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर असलेली ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर विराजमान असलेल्या भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. 

रँकिंगच्या दृष्टीकोणातून भारत ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ आहे, पण हा दौरा भारत्याच्या दृष्टीने तितका सोपा नाही. कारण व्हाईट बॉलमधील किंग रोहित शर्मा वनडे मालिकेसाठी मुकणार आहे. याचा फटका टीम इंडियाला आपल्या फलंदाजीत बसण्याची दाट शक्यता आहे. मुंबई इंडियन्सला आयपीएलचं पाचवे विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितला फलंदाजीतही चांगला सूर गवसलायं. पण, तो दुखापतग्रस्त झाल्यानं त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेला मुकावं लागणार आहे. त्याच्या या दुखापतीचा टीम इंडियाच्या फलंदाजीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

रोहित संघात नसण्यानं विराट कोहलीसमोर शिखर धवन सोबत सलामीला कोणाला पाठवायचं ही डोकेदुखी असणार आहे. विराटसमोर रोहितच्या गैरहाजरीत सलामीसाठी दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय मयांक अग्रवाल. त्यानं यंदाचा आयपीएल हंगाम चांगलाच गाजवलायं. त्यानं ११ सामन्यात ३८.५४ च्या सरासरीनं ४२४ धावा ठोकल्या. यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. मयांकने भारतीय कसोटी संघात आपलं स्थान पक्क केलंय. आता तो वनडे संघाचं दार ठोठावत आहे. मयांक बरोबरच केकेआरचा शुभमन गिलनंही टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. पण, मयांक आणि राहुल या अनुभवी फलंदाजांना डावलून त्याला डावाची सुरुवात करायला मिळेल असं वाटत नाही.

विराट समोर सलामीसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबच्याच सलामीवीराचा दुसरा पर्याय आहे. पंजाबचा कर्णधार असलेल्या केएल राहुलनं युएईच्या वाळवंटात नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात धावांचा पाऊस पाडला. त्यानं १४ सामन्यात ५५.८३ च्या सरासरीनं ६७० धावा केल्या आहेत. त्यात १ शतक आणि तब्बल ५ अर्धशतकांचा समावेश आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या दोन सलामीवीरांनी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानं विराटची डोकेदुखी मात्र वाढवून ठेवली आहे. विराट राहुल आणि अग्रवाल पैकी पहिली पसंती ही केएल राहुललाच देण्याची शक्यता जास्त आहे. राहुलकडे या दौऱ्यात विकेट किपिंगचीही अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. 

तसं बघालयला गेलं तर वनडे संघात केएल राहुल आणि संजू सॅमसन यांची विकेट किपर म्हणून निवड झालीयं. आता फलंदाजीतला समतोल साधण्यासाठी विराटला राहुललाच सलामीला खेळवावं लागेल. त्यामुळे संजू सॅमसनला अंतिम ११ च्या संघात स्थान मिळेल असं वाटत नाही. शिखर धवनसोबत जर राहुल सलामीला आला तर विराट आपल्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्यानंतर श्रेयस अय्यर चौथ्या, मनिष पांडे पाचव्या क्रमाकावर फलंदाजीला येईल. शेवच्या षटकात हाणामारी करण्याची जबाबदारी हार्ड हिटर हार्दिक पांड्यावर असेल. शक्यतो विराट याच कॉम्बिनेशला प्राधान्य देण्याची दाट शक्यता आहे. 

भारताचे पहिले दोन्ही सामने सिडनी ग्राऊंडवर होणार आहेत. सिडनीची खेळपट्टी कायम फिरकीला साथ देते. त्यामुळे विराट कोहली दोन फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरणार की तीन फिरकी गोलंदाज घेऊन उतरणार हे पहावं लागेल. शक्यतो कर्णधार यझुवेंद्र चहल आणि रविंद्र जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांनाच घेऊन मैदानात उतरेल असं दिसतयं. त्यामुळं कुलदीप यादवला बेंचवरच बसावं लागणार. जडेजाला संघात घेतल्याचा फायदा विराटला फलंदाजीची डेप्थ वाढवण्यातही नक्कीच होईल. चहल, जडेजाच्या जोडीला विराट कोहली आपली बुमराह आणि शमी ही अनुभवी तेजतर्रार जोडगोळी मैदानात उतरवेल. 

आता विराट बुमराह आणि शमीबरोबर तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून कोणाला पसंती देतो हे बघणं महत्वाचं आहे. विराटकडे तिसऱ्या जलदगती गोलंदाजासाठी शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी असे  दोन पर्याय आहेत. कर्णधार थोडीफार फलंदाजी करु शकणाऱ्या शार्दुल ठाकूरला संधी देणार की आपल्या वेगानं फलंदाजाची भंबेरी उडवून देणाऱ्या नवदीप सैनीला पसंदी देणार हा प्रश्न आहे. नवदीप सैनीने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करत आपली उपयुक्तता सिद्ध केलीयं तसंच जर संघात जडेजा असेल तर फलंदाजीतील चांगली डेप्थ निर्माण होते. त्यामुळे विराटने शार्दुल ठाकूरच्या ऐवजी तेजतर्रार नवदीप सैनीला पसंती दिली तर आश्चर्य वाटायला नको. 

एकंदर भारतीय संघ कागदावर तरी संतुलीत दिसतोयं. रोहितची अनुपस्थिती टीम इंडियाला फलंदाजीत विशेष करून सलामीला जाणवेल पण, तो नसल्यांन संघाची ताकद पूर्ण कमी झाली आहे असं नाही. फक्त या कागदावर तगड्या वाटणाऱ्या संघानं मैदानावर कामगिरी करायला हवी.   

Back to top button