कठीण प्रसंगी संघाने मला धीर दिला : सिराज | पुढारी

कठीण प्रसंगी संघाने मला धीर दिला : सिराज

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या वडिलांचे शुक्रवारी निधन झाले. पण, मोहम्मद सिराज हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने आणि त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासावर आलेल्या बंधनामुळे त्याला भारतात परतता आले नाही. बीसीसीआयने सिराज आणि त्याच्या कुटुंबियांना भारतात परतण्याची मुभा दिली होती. पण, कसोटी मालिकेसाठी निवड झालेल्या सिराजने ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान, सिराजने ऑस्ट्रेलियात थांबण्याचा का निर्णय घेतला याचे कारण सांगितले. तो म्हणाला की ‘मी भारताकडून खेळत राहताना पाहण्याचे वडिलांचे स्वप्न होते. ते मला पूर्ण करायचे आहे त्यामुळे मी ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेतला.’ तो पुढे म्हणाला की माझ्या वडिलांनी माला कायम पाठिंबा दिला आहे. त्यांच्या जाण्याने माझे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची मी देशाकडून खेळत रहावे आणि देशाचे नाव उंचवावे अशी इच्छा होती. मी फक्त त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहे. जरी ते आता या जगात नाहीत पण ते कायम माझ्या सोबत असतील.’ 

सिराजने वडिलांचे निधन झाल्यावर संघातील खेळाडूंनी मला धीर दिल्याचे सांगितले. तो म्हणाला की संघातील खेळाडूंनी आणि व्यवस्थापनाने मला धीर दिला. विराटने मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कणखर बणण्यास प्रोत्साहन दिले. याचबरोबर सिराजने आपल्या आईबरोबर झालेले संभाषणही शेअर केले. त्याच्या आईनेही त्याला वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियातच थांबण्यास सांगितले. 

मोहम्मद सिराजने २०१७ ला न्यूझीलंड विरुद्धच्या टी – २० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी संघात निवड झाली आहे. सिराजने आतापर्यंत आतापर्यंत १ वनडे आणि तीन टी २० सामने खेळले आहेत. यंदाचा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी चांगला गेला असून त्याने आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ विकेट घेतल्या आहेत. 

Back to top button