फुटबॉल जगताचा तारा निखळला | पुढारी | पुढारी

फुटबॉल जगताचा तारा निखळला | पुढारी

ब्यूनॉस आयर्स : वृत्तसंस्था

1986 मध्ये झालेल्या विश्‍वचषक  फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद अर्जेंटिनाला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या दिग्गज फुटबॉलपटू सर दिएगो मॅराडोना यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 60 वर्षीय मॅराडोना यांच्या निधनाने तमाम फुटबॉल जगतावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने फुटबॉल जगताचा एक ताराच निखळला.

दोन आठवड्यांपूर्वी मॅराडोना यांच्या मेंदूत झालेल्या रक्‍ताच्या गाठी शस्त्रक्रिया करून काढण्यात आल्या होत्या. मॅराडोना यांची टीम गिमनासिया यांनी पॅटरानटोचा 3-0 ने पराभव केल्यानंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात करण्यात आलेल्या स्कॅनिंगनंतर मॅराडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली; पण शस्त्रक्रियेनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. 

जगातील महान फुटबॉलपटू म्हणून दिएगो मॅराडोना यांचे नाव घेतले जाते. 1986 चा वर्ल्डकप अर्जेंटिनाला जिंकून देण्यात मॅराडोना यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती. मॅराडोना हे बार्सिलोना ज्युनिअर, नापोली या नामांकित क्‍लबकडून खेळले होते. आपल्या अनोख्या फुटबॉल शैलीमुळे ते कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

1969 मध्ये गरीब कुटुंबात जन्म 

दिएगो मॅराडोना यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1960 रोजी ब्यूनॉस आयर्समध्ये एका गरीब कुटुंबात झाला. मॅराडोनासह दोन भाऊ आणि चार बहिणी अशी एकूण सात भावंडे. मॅराडोनाने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस अर्जेंटिना ज्युनिअरकडून सुरुवात केली. या क्‍लबकडून खेळताना मॅराडोना 16 नंबरची जर्सी वापरावयाचा. या क्‍लबकडून मॅराडोना 1976 ते 1981 दरम्यान म्हणजे पाच वर्षे खेळला. या दरम्यान त्याने 167 सामन्यांत तब्बल 115 गोलांचा पाऊस पाडला. 

व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात

20 फेब्रुवारी 1981 रोजी मॅराडोनाला बोका ज्युनिअर्सशी करारबद्ध   केले. मॅराडोनाच्या शानदार खेळामुळे बोका ज्युनिअर्ससाठी हे वर्ष फारच चांगले गेले. 1982 मध्ये झालेल्या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर मॅराडोनाने बार्सिलोनाकडून खेळण्यास सुरुवात केली. 1983 मध्ये मुख्य प्रशिक्षक सिझर लुईस मेन्‍नोट्टी यांचे मार्गदर्शन व मॅराडोनाच्या शानदार खेळाच्या बळावर बार्सिलोनाने स्पेनमधील वार्षिक कोपा डेल रे चषक स्पर्धा जिंकली. मात्र, याचवेळी वादांनी आणि दुखापतींनी मॅराडोना त्रस्त झाला होता.

1982 मध्ये खेळला पहिला वर्ल्डकप

महान खेळाडू मॅराडोनाने आपल्या कारकिर्दीतील पहिला वर्ल्डकप 1982 मध्ये खेळला. मात्र, त्याची या स्पर्धेत कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मॅराडोनाने या स्पर्धेत सलग पाच सामने खेळताना हंगेरीविरुद्ध दोन गोल नोंदविले. मात्र, अन्य खेळाडूंकडून म्हणाली तशी साथ न मिळाल्याने अर्जेंटिनाचे आव्हान या स्पर्धेत लवकरच संपुष्टात आले.

अर्जेंटिनाला जिंकून दिला वर्ल्डकप

1986 मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाच्या संघाची जबाबदारी मॅराडोनावर सोपविण्यात आली. मेक्सिकोत झालेल्या या स्पर्धेत मॅराडोनाने आपल्या शानदार आणि चतुरस्त्र कौशल्याच्या बळावर अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून दिला. फायनलमध्ये अर्जेंटिनासमोर पश्‍चिम जर्मनीचे तगडे आव्हान होते. अ‍ॅझटेझा येथे झालेल्या या सामन्यात सुमारे एक लाख 15 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने अर्जेंटिनाने पश्‍चिम जर्मनीचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव करीत  विश्‍वचषक स्पर्धा जिंकली. तर मॅराडोना हा विजयी कर्णधार ठरला.

1990 च्या वर्ल्डकपमध्ये दुखापतीमुळे कारकिर्दीवर परिणाम

इटलीमध्ये 1990 मध्ये विश्‍वचषक स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठीही कर्णधारपदाची जबाबदारी मॅराडोनावरच सोपविण्यात आली होती. मात्र, याचवेळी घोट्याच्या दुखापतीने उचल खाल्ली. या दुखापतीचा परिणाम मॅराडोनाच्या वर्ल्डकपमधील कामगिरीवर झाला. तरीही मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारली. मात्र, पश्‍चिम जर्मनीकडून अर्जेंटिनाला 1-0 ने पराभव पत्करावा लागला. जर्मनीच्या वतीने एकमेव गोल 85 व्या मिनिटाला अँड्रियास ब्रेहमे याने नोंदविला होता.

1994 च्या वर्ल्डकपमध्ये खेळले केवळ दोन सामने

अमेरिकेत झालेली ही स्पर्धा मॅराडोनाच्या कारकिर्दीतील शेवटची वर्ल्डकप स्पर्धा ठरली. या स्पर्धेत मॅराडोनाने सुरुवातीचे दोनच सामने खेळले होते. यामधील ग्रीसविरुद्धच्या सामन्यात मॅराडोनाने एक गोलही नोंदविला. दुसर्‍या लढतीत अर्जेंटिनाने नायजेरियाला 2-1 अशा फरकाने पराभूत केले. मात्र, दुर्दैवाने हाच सामना मॅराडोनाच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. कारण, याचवेळी त्याची डोप चाचणी घेण्यात आली अन् ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याला चक्‍क घरी पाठवण्यात आले. जवळ जवळ इथेच मॅराडोनाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यानंतरचे त्याचे संपूर्ण आयुष्य आजारांनी त्रस्त बनले होते. शेवटी 25 नोव्हेंबर 2020 रोजी मॅराडोना पर्वाचा अस्त झाला.

मॅराडोना यांचा परिचय

नाव : दिएगो अरमँडो मॅराडोना

जन्म : 30 ऑक्टोबर 1960

स्थळ : ब्यूनॉस आयर्स, अर्जेंटिना

मृत्यू : 25 नोव्हेंबर 2020

स्थळ : ब्यूनॉस आयर्स, अर्जेंटिना

खेळाडू : मिडफिल्डर, सेकंड स्ट्रायकर

वर्ल्डकप विजय : 1986

 

Back to top button