INDvAUS : भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पराभवाने | पुढारी

INDvAUS : भारताची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात पराभवाने

मुंबई: पुढारी ऑनलाईन

लॉकडाऊन नंतर आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या भारताला ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामन्यात ६६ धावांनी मात दिली. ऑस्ट्रेलियाच्या ३७५ धावांचे आव्हान पार करताना भारताला ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पांड्याने झुंजार खेळी करत ९० धावा केल्या. त्याला सलामीवीर शिखर धवनने ७४ धावा करत चांगली साथ दिली. पण, कांगारुंच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या इतर फलंदाजांची भंबेरी उडाली. ऑस्ट्रेलियाकडून झाम्पाने ४ तर हेजलवूडने ३ विकेट घेतल्या. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करत कांगारुंनी कर्णधार फिंच ( ११४ ) आणि स्मिथ ( १०५ ) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर ३७४ धावांचा डोंगर उभारला. वॉर्नरनेही ६९ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत ३ एकदिवसीय सान्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे. 

ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या ३७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, त्यानंतर जॉस हेडलवूडने तीन धक्के देत भारताचा अवस्था १० षटकात ३ बाद ८० धावा अशी केली. हेजलवूडने मयांकला २२, विराटला २१ तर श्रेयस अय्यरला शून्यावर बाद केले. हेजलवूडने भारतीय फलंदाजांच्या विरुद्ध अखूड चेंडूंचा सुरेख मारा केला. त्याच्या या रणनितीवर भारताच्या मोठमोठ्या फलंदाजांकडे कोणताही तोड नव्हता. 

भारताच्या या पडझडीनंतर शिखर धवन आणि केएल राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौदाव्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. पण, अॅडम झाम्पाने १२ धावांवर खेळणाऱ्या केएल राहुलला बाद करत भारताला चौथा धक्का दिला. राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने धनवच्या साथीने भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताला २३ व्या १५० च्या पार पोहचवले. हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करत झपाट्याने धावा करण्यास सुरुवात केली. त्याने ३१ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. दरम्यान, दुसऱ्या बाजूने सावध फलंदाजी करणाऱ्या शिखर धवननेही ५५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

पण, २५ षटकांचा खेळ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हार्दिक पांड्या आणि शिखर धवनला टिच्चून मारा करण्यास सुरुवात केली. कांगारूंच्या गोलंदाजांनी या दोघांच्या बॅटमधून येणारे चौकार थांबवले. त्यामुळे धावगती मंदावली. त्यातच झाम्पाने ७४ धावांवर खेळणाऱ्या शिखर धवनला बाद करुन ही जोडी फोडली. शिखर आणि हार्दिकने पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची झुंजार भागिदारी रचली. 

शिखर बाद झाल्यानंतर हार्दिकने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत संघाचे धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. पण, याच दबावात तो झाम्पाच्या गोलंदाजीवर ७६ चेंडूत ९० धावा करुन बाद झाला. हार्दिक बाद झाल्यानंतर भारताच्याही सामना जिंकण्याचा आशा जवळपास संपल्या. जडेजानेही २५ धावा करत बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोहम्मद शमीने काही आक्रमक फटके मारत भारताला ३०० च्या पार पोहचवले. पण, भारताला ५० षटकात ८ बाद ३०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सामना ६६ धावांनी गमावला. 

तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी १९ षटकात शतकी सलामी दिली. कर्णधार फिंचने ७० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर वॉर्नरनेही आपले अर्धशतक पूर्ण करत आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. 

शतकी सलामीनंतर या दोघांनी आपली धावगती वाढवत संघाला २८ व्या षटकात दिडशतकाचा टप्पा पार करुन दिला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असतानाच मोहम्मद शामीने ७६ चेंडूत ६९ धावा करणाऱ्या वॉर्नरला बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. वॉर्नर बाद झाल्यानंतर आलेल्या स्मिथने एकेरी दुहेरीवर भर देत कर्णधार फिंचबरोबर भागिदारी रचण्यास सुरुवात केली. भारतीय गोलंदाज स्मिथला अधून मधून चकवा देत होते. पण, दोघांनी संघाचे द्विशतक धावफलकावर लावले.  दरम्यान, फिंच शतकाच्या आणि स्मिथ अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. स्मिथने आपले अर्धशतक आधी पूर्ण करुन घेतले. त्यानंतर फिंचनेही आपले शतक पूर्ण केले. 

फिंच आणि स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागिदारी रचल्यानंतर बुमराहने ११४ धावांची शतकी भागिदारी करणाऱ्या फिंचला बाद करुन ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या धडाकेबाज मार्कस स्टॉइनिसला चलहने शून्यावर बाद करत कांगारूंना तिसरा धक्का दिला. पण, या दोन धक्यातून संघाला स्मिथने सावरत ४३ व्या षटकात ३०० च्या पार पोहचवले. त्याला साथ देण्यासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या मॅक्सवेलनेही आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी पाच षटकात ५७ धावांची आक्रमक भागिदारी रचली. पण, शमीने १९ चेंडूत ४५ धावांची खेळी करणाऱ्या मॅक्सवेलला बाद करत ही जोडी फोडली. 

मॅक्सवेलनंतर आलेल्या मार्कस लॅम्बुश्चग्ने ला २ धावांवर बाद करत कांगारूंना पाचवा धक्का दिला. जरी ऑस्ट्रेलियाचे पाच  फलंदाज बाद झाले असले तरी सूर गवसलेल्या स्मिथ क्रिजवर होता. त्याने आपले शतक पूर्ण करत ऑस्ट्रेलियाला ३५० च्या पार पोहचवून दिले. अखेर मोहम्मद शमीने त्याला बाद केले. पण, तोपर्यंच त्याने ६६ चेंडूत १०५ धावा करुन संघाला ५० षटकात ६ बाद ३७४ धावांपर्यंत पोहचवले. 

Back to top button