INDvsAUS : स्मिथचे पाठोपाठ दुसरे शतक, ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय | पुढारी

INDvsAUS : स्मिथचे पाठोपाठ दुसरे शतक, ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ५१ धावांनी पराभव करुन मालिका २ – ० अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ४ बाद ३८९ धावा केल्या. हे महाकाय आव्हान भारताला पेलवले नाही. भारताला ५० षटकात ९ फलंदाजांच्या मोबदल्यात ३३८ धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने पहिल्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात दमदार शतक ( १०४ ) ठोकले. तर वॉर्नर ( ८३ ), फिंच ( ६० ), लॅम्बुश्चग्ने ( ७० ) आणि मॅक्सवेलने आक्रमक ( ६३ ) धावा करुन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्याला चांगला हातभार लावला. कांगारुंच्या ३९० धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८९ धावांची झुंजार खेळी केली. त्याला केएल राहुलनेही ७६ धावा करुन चांगली साथ दिली. पण, डोक्यावर असणार धावांचा डोंगर आणि कांगारुंनी मोक्याच्या क्षणी काढलेल्या विकेट यामुळे भारताला ५० षटकात ३३८ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

ऑस्ट्रेलियाचे ३९० धावांचे मोठे आव्हान घेऊन फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने आश्वासक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, जॉश हेजलवूडने पुन्हा एकदा भारतीय फलंदाजीला भगदाड पाडण्यास सुरुवात केली. त्याने ३० धावा करणाऱ्या शिखर धवनला बाद करत भारताला ५८ धावांवर पहिला धक्का दिला. त्यानंतर पॅट कमिन्सने मयांक अग्रवालला २८ धावांवर बाद करत अजून एक धक्का दिला. त्यामुळे भारताची अवस्था बिनबाद ५८ धावांवरुन २ बाद ६० अशी झाली. 

मात्र त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी संघाला २० षटकात १२६ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, सेट झाल्यानंतर कोहलीने आपली धावगती वाढवली. त्याने ५३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर टीम इंडियानेही आपला १५० चा टप्पा पार केला. मात्र ही जोडी हेन्रीकेजने श्रेयस अय्यरला ३८ धावांवर बाद करत फोडली. 

श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर आलेल्या केएल राहुलने कर्णधार विराट कोहलीला चांगली साथ देण्यास सुरुवात केली. या दोघांनी मिळून भारताला ३२ षटकात २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. दरम्यान, विराट कोहली आपल्या शतकाजवळ पोहचला होता. पण, हेजलवूडने पुन्हा एकदा भारताला दणका देत विराटला ८९ धावांवर बाद केले. विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने ५५ अर्धशतक ठोकत संघाला ३९ व्या षटकात २५४ धावांपर्यंत पोहचवले. त्याला साथ देण्यासाठी आलेल्या हार्दिक पांड्याही सेट होत होता. पण, धावा आणि चेंडूतील अतंर वाढत चालल्याने केएल राहुलला आक्रमक फटके खेळणे भाग होते. त्याने झाम्पाच्या गोलंदाजीवर धोका पत्करुन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, तो ७६ धावांवर हेजवलवूडकडे झेल देऊन परतला. 

राहुल बाद झाल्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाने आल्या आल्या आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने आणि पांड्याने ४५ व्या षटकात भारताला ३०० चा टप्पा पार करुन दिला. पण, पॅट कमिन्सने ११ चेंडूत २८ धावा करणाऱ्या रविंद्र जडेजा आणि ३१ चेंडूत २८ धावा करणाऱ्या हार्दिक पांड्याला पाठोपाठ बाद करत भारताला पराभवाच्या खाईत ढकलले.  

तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंचने मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यातही शतकी सलामी दिली. डेव्हिड वॉर्नरने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजूने अडखळती सुरुवात करणाऱ्या फिंचने सावध फलंदाजी केली.पण, नंतर त्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणे या ही सामन्यात स्वैर मारा केला.  फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर केलेल्या स्वैर माऱ्याने कांगारुंच्या फलंदाजांना आयते कोलीत मिळाले.

वॉर्नर आणि फिंच ही जोडी याही सामन्यात दिडशतकी भागिदारी रचण्याच्या मार्गावर होती. पण, शमीने ६० धावांवर खेळणाऱ्या फिंचला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. पाठोपाठ श्रेयस अय्यरने ८३ धावांवर खेळणाऱ्या वॉर्नरला धावबाद करत भारताला मोठा दिलासा दिला. पण, हा दिलासा फार काळ टिकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या स्मिथने आक्रमक फलंदाजी करत संघाला ३२ व्या षटकात २०० च्या पार पोहचवले. त्याने लॅम्बुश्चग्ने बरोबर वेगाने अर्धशतकी भागिदारी रचली. दरम्यान, स्मिथने ३८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने एकेरी दुहेरी धावा करत लॅम्बुश्चग्नेही सेट झाला होता. 

अर्धशतकानंतर स्मिथने आपला धावांचा वेग वाढवत भारतीय गोलंदाजांवर दबाव वाढवला. त्याने ६२ चेंडूतच आपले वेगवान शतक पूर्ण करुन मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकले. यामुळे ऑस्ट्रेलिया ४१ व्या षटकातच ३०० च्या जवळ पोहचला. पण, अनेक महिन्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या हार्दिक पांड्याने स्मिथला १०४ धावांवर बाद करत ही शतकी खेळी संपवली. दरम्यान, सेट झालेल्या लॅम्बुश्चग्नेने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला ३०० च्या पार पोहचवले. 

डावाची अखेरची ५ षटके शिल्लक असताना लॅम्बुश्चग्ने आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८० धावांची भागिदारी रचत ऑस्ट्रेलियाला ३७० च्या पार पोहचवले. अखेर बुमराहने लॅम्बुश्चग्नेला ७० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पण, दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करणाऱ्या मॅक्सवेलने २५ चेंडूत अर्धशतक झाळकावत भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. त्याने अखेरच्या षटकात दोन षटकार मारत कांगारुंना ३८९ धावांपर्यंत पोहचवले. 

Back to top button