दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, वॉर्नर 'आऊट' | पुढारी

दुखापतग्रस्त ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, वॉर्नर 'आऊट'

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय (ODI) मालिकेत ऑस्ट्रेलियाने २ -० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण, विजयी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला या मालिकेदरम्यान दुखापतींनी चांगलेच ग्रासले आहे. आता मार्कस स्टॉइनिस पाठोपाठ धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (Australia david warner)  देखील दुखापतग्रस्त झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज दिलेल्या माहितीनुसार डेव्हिड वॉर्नर त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे एकदिवसीय मालिकेतील अखेरचा तिसरा सामना आणि टी-२० मालिका खेळू शकणार नाही. 

डेव्हिड वॉर्नरला रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापत झाली होती. त्याचा मांडीचा स्नायू दुखावला होता. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या दुखापतीवर अधिक माहिती देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, ‘डेव्हिड वॉर्नर शेवटचा एकदिवसीय सामना आणि टी-२० मालिका खेळणार नाही. सध्या तो दुखापतीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे. १७ डिसेंबर पासून सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्याचा त्याचा मानस आहे.’ 

टी-२० मालिकेसाठी डेव्हिड वॉर्नरच्या जागी डी’ आर्सी शॉर्ट याची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स यालाही पुढील एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आल्याचे सांगितले. संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी ‘पॅट आणि डेव्हिड हे कसोटी मालिकेसाठी आमचे महत्वाचे खेळाडू आहेत. डेव्हिड हा दुखापतीतून सावण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि पॅट कमिन्सला यंदाचा पूर्ण हंगाम मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या फिट ठेवणे गरजेचे आहे. यामुळे या दोघांना मायदेशात होणाऱ्या महत्वाच्या आणि मोठ्या कसोटी मालिकेसाठी पूर्ण तयारी करता यावी यासाठी याला प्राथमिकता दिली आहे. हा निर्णय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोणातून घेतला आहे.’

वॉर्नरच्या जागी संधी मिळालेला शॉर्ट हा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया कडून खेळतो. तो २०१७ – १८, आणि २०१८ – १९ मध्ये झालेल्या बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सामील होता. सध्या पॅट कमिन्सच्या जागी कोणत्याही दुसऱ्या खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे पांढऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाची भिस्त जॉस हेजलवूड, स्टार्क आणि अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस यांच्यावरच असणार आहे. 

Back to top button