आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप : भारताचे दुसरे स्थान कायम | पुढारी

आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप : भारताचे दुसरे स्थान कायम

दुबई : वृत्तसंस्था

भारताने मेलबर्न कसोटी सामन्यात विजय मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये (डब्ल्यूटीसी) पुढील वर्षी होणारा अंतिम सामना खेळण्याच्या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात भारतीय संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी कायम आहे. भारताने मेलबर्न येथील सामना आठ विकेटस्नी जिंकत 30 गुणांची कमाई केली. संघ 390 गुणांसह 72.2 टक्के गुणांसह दुसर्‍या स्थानी कायम आहे. भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामना गमावल्यानंतर आणि धीम्या षटकांच्या गतीसाठी दंड आकरल्यानंतरदेखील ऑस्ट्रेलियन संघ अव्वल स्थानी आहे. संघाचे 322 गुणांसह 76.6 टक्के गुण आहेत.

पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघावर 101 धावांनी विजय मिळवल्यानंतर न्यूझीलंड संघाने तिसर्‍या स्थानावर आपली स्थिती भक्कम केली आहे. संघाने या विजयासह 60 गुण मिळवले आणि त्यांचे 66.7 टक्के गुण आहेत. आयसीसीने बुधवारी ट्विट केले  की, न्यूझीलंड आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल खेळण्याच्या शर्यतीत कायम आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत इंग्लंड आणि पाकिस्तान संघ अव्वल पाच संघांमध्ये आहेत. साखळी फेरी संपल्यानंतर गुणांच्या टक्केवारीच्या आधारे अव्वल दोन स्थानी राहणारे संघ फायनल खेळतील. लीगमधील प्रत्येक मालिका ही 120 गुणांची असते. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी प्रत्येक लढतीला 60, तर पाच सामन्यांच्या मालिकेसाठी हा आकडा प्रत्येक सामन्यासाठी 24 गुण देण्यात येतात. भारत गुणांच्या आधारे अव्वल स्थानी आहे; पण आयसीसीतर्फे गेल्या महिन्यात गुणप्रणालीमध्ये संशोधन करण्यात आले. अव्वल दोन संघांचा निर्णय हा गुणांच्या टक्केवारीवर होणार आहे.

Back to top button