AUSvsIND : 'अजिंक्य' टचमुळे दुसऱ्या कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात | पुढारी

AUSvsIND : 'अजिंक्य' टचमुळे दुसऱ्या कसोटीत भारताची ऑस्ट्रेलियावर मात

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन 

दुसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजांनी नियंत्रित मारा करून पहिल्या डावात १९५ धावात रोखले. भारताकडून बुमराहने ४ तर अश्विनने ३ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावात ३२६ धावा ठोकल्या. त्यात कर्णधार अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकाचा ( १०४ ) सिंहाचा वाटा राहिला.

पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय गोलंदाजांना पुन्हा एकदा सांघिक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला २०० धावात गुंडाळले. दुसऱ्या डावात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने प्रभावी मारा करत ३ विकेट घेतल्या. त्याला जडेजा, अश्विन, बुमराहने प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली.चौथ्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी फक्त ७० धावांची गरज होती. पहिल्या दोन धक्यानंतरही शुभमन गिलच्या आक्रमक ३५ आणि रहाणेच्या २६ धावांच्या जोरावर भारताने हे आव्हान १६ षटकातच पार केले. 

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आणण्यास सुरुवात केली. तिसऱ्या दिवशीच्या ६ बाद १३३ पासून पुढे खेळताना कॅमेरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स यांनी अजून २३ धावांची भर घालत संघाला १५० चा टप्पा पार करुन दिला. पण, त्यानंतर बुमराहने पॅट कमिन्सला २२ धावांवर  बाद करत ही जोडी फोडली. या जोडीने सातव्या विकेटसाठी ५७ धावाची भागिदारी रचली. 

कमिन्स बाद झाल्यानंतर ग्रीननेही फार काळ टिकला नाही. मोहम्मद सिराजने त्याला ४५ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला ८ वा धक्का दिला. सिराजने ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला जास्त वळवळ करण्याची संधी दिली नाही. त्याने ग्रीन पाठोपाठ नॅथन लायनलाही ( ३ ) बाद करत कांगारुंची अवस्था ९ बाद १८५ अशी केली. त्यानंतर स्टार्क  ( १४ )आणि हेजलवूड यांनी थोडी वळववळ करत ऑस्ट्रेलियाला २०० पर्यंत पोहचवले. अखेर अश्विनने हेजलवूडचा ( १ ० ) त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावात संपवला. आता भारतासमोर विजयसाठी ७० धावांचे माफक आव्हान होते. 

पण, हे माफक आव्हान पार करताना भारताची सुरुवात खराब झाली. स्टार्कने सलामीवीर मयांक अग्रवालला ५ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर कमिन्सने पुजाराला ३ धावांवर बाद करत भारताची अवस्था २ बाद १९ अशी केली. 

मात्र त्यानंतर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने झपाट्याने धावा करण्यास सुरुवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची नाबाद भागिदारी रचत भारताला सामना ८ गडी राखून जिंकून दिला. शुभमन गिलने नाबाद ३५ तर अजिंक्य रहाणेने नाबाद २७ धावा केल्या. 

Back to top button