DC vs PBKS : दिल्‍ली लय भारी, पंजाबला १७ धावांनी धूळ चारली | पुढारी

DC vs PBKS : दिल्‍ली लय भारी, पंजाबला १७ धावांनी धूळ चारली

मुंबई ; वृत्तसंस्था : शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या त्रिकुटाने केलेली अफलातून गोलंदाजी आणि मिशेल मार्श याने केलेली 63 धावांची धीरोदात्त खेळी यांच्या बळावर (DC vs PBKS) दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला 17 धावांनी धूळ चारली. त्यामुळे तेरा सामन्यांतून दिल्लीचे 14 गुण झाले असून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशांना मोठेच बळ मिळाले आहे.

दिल्लीने अशा प्रकारे सातव्या विजयाची नोंद केली आहे. दुसरीकडे पंजाबला सातवा पराभव स्वीकारावा लागला असून त्यांना 12 गुणांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी प्ले ऑफचे स्वप्न खूपच धूसर बनले आहे.

दिल्लीने पंजाबपुढे विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यांना 9 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबची सुरुवात चांगली झाली. जॉनी बेअरस्टोने 28 तर शिखर धवन याने 19 धावा केल्या. या दोघांनी 38 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर पंजाबच्या तिखट मार्‍यापुढे दिल्लीची मधली फळी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. भानुका राजपक्षे 4, लियाम लिव्हिंगस्टोन 3 हे बिनीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर कर्णधार मयंक अग्रवाल याला भोपळाही फोडता आला नाही.

कारण नसताना त्याने अक्षर पटेलला उंचावरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्या नादात तो क्रीज सोडून बराच पुढे आला. मग त्याला यष्टिचीत करण्याची कामगिरी यष्टिरक्षक तथा कर्णधार ऋषभ पंत याने आरामात पार पाडली. मयंक अशा बेजबाबदार पद्धतीने बाद झाल्यानंतर संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आपला संताप लपवता आला नाही. (DC vs PBKS)

अग्रवाल बाद झाल्यानंतर हरप्रीत ब्रार 4 आणि ऋषी धवन 1 हेही प्रतिकार न करताच तंबूत परतले. पंजाबकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीने धुमाकूळ घातला. त्यामुळे पंजाबचे 7 गडी 82 धावांतच तंबूत परतले होते. त्यानंतर जीतेश शर्मा याने संघाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि त्याने चौकार तथा षटकारांची आतषबाजी करून सामन्यात रंग भरला. खलील अहमद याने सामन्यातील सतराव्या षटकात 12 धावा मोजल्या. राहुल चहरने त्याची चांगलीच धुलाई केली.

मग जिगरबाज जीतेश शर्माला ठाकूरने वॉर्नरकरवी झेलबाद केले. त्याने 44 धावांची अप्रतिम खेळी केली. पाठोपाठ ठाकूरने रबाडाला तंबूत पाठवून दिल्लीची हालत 9 बाद 131 अशी केली. एकाच षटकात ठाकूरने ही किमया साधली. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 35 धावांत 4 मोहरे टिपले. अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तसेच एन्र्रिच नोर्टजेने1 मोहरा गारद केला.

त्यापूर्वी पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल याने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पंजाबने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 159 धावा टोलवल्या. मिशेल मार्शची 63 धावांची खेळी हे दिल्लीच्या डावाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. दिल्लीची सुरुवात धक्कादायक झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सामन्यातील पहिल्याच चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनचा बळी ठरला. राहुल चहरने वॉर्नरचा झेल पकडला. अशा प्रकारे वॉर्नर गोल्डन डकची शिकार ठरला. (DC vs PBKS)

त्यानंतर सर्फराज खान आणि मिशेल मार्श यांनी दुसर्‍या विकेटसाठी 51 धावांची बहुमूल्य भागीदारी केली. खानने 32 धावांची तडाखेबंद खेळी केली. 16 चेंडूंचा सामना करून त्याने 5 चौकार व षटकार खेचला. मार्शने एक बाजू उत्तमरीत्या लावून धरली होती. अष्टपैलू ललित यादव याने 21 धावा चोपल्या. मात्र, कर्णधार ऋषभ पंत सपशेल अपयशी ठरला. त्याला वैयक्‍तिक 7 धावांवर लिव्हिंगस्टोनने तंबूत पाठवले. पंतला यंदाच्या आयपीएलमध्ये दारुण अपयश आले आहे. धडाकेबाज रोव्हमन पॉवेल हाही केवळ 2 धावा करून तंबूत परतला. तोदेखील लिव्हिंगस्टोनचाच बळी ठरला.

दरम्यान, 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्यानंतर मिशेल मार्शला कागिसो रबाडाने तंबूचा रस्ता दाखवला. मार्शने 48 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 3 षटकार लगावले. लगेचच अर्शदीपने शार्दूल ठाकूरला 3 धावांवर टिपले. पंजाबकडून लिव्हिंगस्टोन आणि अर्शदीप सिंग यांनी अतिशय प्रभावी गोलंदाजी केली. राहुल चहर याने तर आपल्या 4 षटकांत अवघ्या 19 धावा दिल्या. लिव्हिंगस्टोनने 4 षटकांत 27 धावा देत तीन मोहरे टिपले. अर्शदीप सिंगने 4 षटकांत 37 धावा देऊन 3 बळी मिळवले. रबाडाने 1 मोहरा टिपला.

Back to top button