England vs India day 4 : भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज | पुढारी

England vs India day 4 : भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज

नॉटिंगहॅम : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लड ( England vs India day 4 ) यांच्यातील पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशी इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद ३०३ धावा केल्या. दुसऱ्या डावात इंग्लंडने २०८ धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने झुंजार शतकी ( १०९ ) खेळी केली. अखेर ही खेळी जसप्रीत बुमराहने संपवली. बुमराहने भेदक मारा करत ६४ धावात ५ बळी घेतले. त्याला मोहम्मद शामी आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली.

दरम्यान, २०९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला के. एल राहुलच्या रूपात पहिला धक्का बसला. त्याने २६ धावांची खेळी केली. रोहित शर्मा १२ व व चेतेश्वर पुजारा १२ धावांवर खेळत असून टीम इंडियाने दिवसअखेर १ बाद ५२ धावा केल्या आहेत. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी १५७ धावांची गरज आहे.

पहिले सत्र ( England vs India day 4 )

भारत आणि इंग्लड ( England vs India day 4 ) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताला पहिले यश मिळाले. मोहम्मद सिराजने सलामीवीर रोरी बर्न्सला १८ धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. बर्न्स बाद झाल्यानंतर आलेल्या झॅक क्राऊलीने चौकार मारतच धडाकेबाज सुरुवात केली.

मात्र जसप्रीत बुमराहने त्याला ६ धावांवर बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र क्राऊली बाद झाल्यानंतर कर्णधार जो रूट आणि सिब्लेने इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी रचत भारतावर लीड घेण्यास सुरुवात केली. त्यांनी इंग्लंडला शतकाच्या पार पोहचवले. रुटने आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले.

दुसरे सत्र, रुट शतकाच्या समीप

अखेर बुमराहने सावध फलंदाजी करणाऱ्या सिब्लेला २८ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर रुटने जॉनी बेअरस्टोच्या साथीने इंग्लंडला १५० चा टप्पा पार करुन दिला. या दोघांनी ४२ धावांची भागीदागी रचली. मात्र सिराजने बेअरस्टोला ३० धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

त्यानंतर रुटने डॅनियल लॉरेन्सला साथीला घेत इंग्लंडला २०० चा टप्पा पार करुन दिला. अखेर शार्दुल ठाकूरने लॉरेन्सला २५ धावांवर बाद करत इंग्लंडला पाचवा धक्का दिला. दरम्यान रूट आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता.

तिसरे सत्र : रुटचे शतक 

चहापानानंतर शार्दुल ठाकूरने बटलरचा १७ धावांवर त्रिफळा उडवत तिसऱ्या सत्राची सुरुवात चांगली केली. मात्र रुटने आपले झुंजार शतक पूर्ण केले. त्याने सॅम करन सोबत भागीदारी रचत भारताला अणखी यश मिळू दिले नाही. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जसप्रीत बुमराहने रुटला १०९ धावांवर बाद करत मोठा दिलासा दिला.

रुट बाद झाल्यानंतर सॅम करनने आक्रमक फटकेबाजी करत आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. बुमराहने त्याला ३२ धावांवर बाद करुन हा मनसुबा उधळून लावला. बुमराहने पाठोपाठ ब्रोडचा त्रिफळा उडवत आपली पाचवी शिकार केली. दरम्यान इंग्लंडने आपला ३०० धावांचा टप्पा पार करत आघाडीही २०० पार नेली. अखेर शमीने रॉबिन्सला १५ धावांवर बाद करत इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावात संपवला. इंग्लंडलने दुसऱ्या डावात २०८ धावांची आघाडी घेतली.

पाहा व्हिडिओ : खेकड्याचा रस्सा तयार करण्याची भन्नाट रेसीपी

Back to top button