भारताची सुवर्णकन्या हिमा दास बनली DSP! | पुढारी

भारताची सुवर्णकन्या हिमा दास बनली DSP!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारताची स्टार महिला धावपटू हिमा दास ही शुक्रवारी आसाम पोलिस दलात डीएसपी पदावर रुजू झाली. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनेवाल यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिमाची डीएसपी पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमा दासचा भारतीय क्रीडाविश्वातील प्रवास थक्क करणारा आहे. आसाममधील धिंग गावातील तिचा जन्म झाला. हिमाने आयएएएफच्या वर्ल्ड अंडर २०च्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपटू आहे. हिमाच्या नावावर ४०० मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे.

हिमा दास पोलिस दलात दाखल झाल्या हिमा म्हणाली…

शाळेत असल्यापासून माझी पोलिस दलात अधिकारी होण्याची इच्छा होती. माझ्या आईची देखील हीच इच्छा होती, असे तिने सांगितले. पोलिस दलात दाखल झालो असलो तरी हिमाने धावपटू म्हणून करिअर सुरूच ठेवणार असल्याचे तिने म्हटले आहे. 

भारताची स्टार धावपटू हिमा दास ही जवळपास दीड वर्षानंतर नुकतीच ट्रॅकवर उतरली आणि तिनं पहिल्याच स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. इंडियन ग्रा प्री २ च्या महिला गटात तिनं हे यश मिळवले. आसामच्या धावपटू हिमा दासनं २३.२१ सेकंदाची वेळ नोंदवली. दुखापतीमुळे आणि त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे ती बराच काळ ट्रॅकपासून दूर होती.

हिमानं सुवर्णपदक जिंकले असले तरी तिला टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठीची २२.८० सेकंदाची पात्रता वेळ गाठता आली नाही.  एप्रिल २०१९ मध्ये तिला दुखापत झाली आणि तिनं फक्त १०० व २०० मीटर शर्यतीत भाग घेण्याचे ठरवले. २०० मीटर शर्यतीत हिमासह फक्त एक स्पर्धक धावली. दिल्लीच्या सिमरनदीप कौरनं २४.९१ सेंकदाची वेळ नोंदवली. 

Back to top button