दीड दिवसाच्या गणपतीचे अहमदाबादला विसर्जन | पुढारी

दीड दिवसाच्या गणपतीचे अहमदाबादला विसर्जन

स्वीच HIT : निमिष पाटगावकर

एखाद्या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाने आपल्या यंदाच्या जंगी सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी जाहिरात करावी, प्रचंड मोठा मंडप आणि सुंदर सजावट करावी. मात्र, प्राणप्रतिष्ठा झाल्यावर हा उत्सव न राहता दीड दिवसात गणपतीचे विसर्जन करायची वेळ यावी, असेच अहमदाबादच्या पहिल्या वाहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याबद्दल बोलावे लागेल. जगातले सर्वात मोठे स्टेडियम, एक लाख बत्तीस हजार आसनक्षमता, रंगीबेरंगी स्टँडस् आणि उत्तम सोयीसुविधा यांनी नटलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अपेक्षा होती ती एका उत्तम कसोटी सामन्याची; पण पदरात पडला तो केवळ दीड-दोन दिवसांचा खेळखंडोबा. गुलाबी चेंडू हा घोळ घालणार हे नक्की होते. मात्र, खेळपट्टी आणि चेंडू या युतीने बळींचा सडा पाडला आणि कसोटीचा निकाल लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 1935 नंतर इतक्या कमी वेळात संपलेली ही दुसरी कसोटी ठरली. निव्वळ 140.2 षटकांत अख्खी कसोटी संपली. 

चेन्नईची पहिली कसोटी हरल्यावर यजमानांनी अशा खेळपट्ट्या बनवायचा चंग बांधलेला दिसतो ज्यावर पाहुण्यांना उभे राहता येणार नाही. चेन्नईच्या दुसर्‍या कसोटीत आपल्या चार फलंदाजांनी फिरकीला साथ देणार्‍या खेळपट्टीवर कसे खेळायचे धडे दिले; पण अहमदाबादला एक रोहित शर्माची पहिल्या डावातील खेळी सोडली तर आपल्या फलंदाजांनीही फलंदाजीला जाणे म्हणजे फक्त उपस्थितीच्या मस्टरवर सही करून परतल्यासारखे होते. गुलाबी चेंडू, खेळपट्टी हे बाजूला ठेवून जर निव्वळ क्रिकेटचे परीक्षण करायचे झाले तर प्रथम संघनिवडीबाबत करावे लागेल. गुलाबी चेंडू हा स्विंगला मदत करेल या आशेवर इंग्लंडने अँडरसन, ब्रॉड आणि आर्चर हे त्रिकूट ठेवले तर लीच हा एकमेव मुख्य फिरकीपटू घेतला. याउलट भारताने खेळपट्टीला उत्तम ओळखले होते. बुमराह, इशांत शर्मा हे दोनच जलदगती गोलंदाज खेळवत फलंदाजी मजबूत करायच्या द़ृष्टीने आपण वॉशिंग्टन सुंदरला अश्विन आणि पटेलच्या साथीला आणले. इंग्लंडने डॉम बेसला घेतले असते तर इंग्लंडची बाजूही या खेळपट्टीवर खेळायला मजबूत झाली असती. तेव्हा संघनिवडीत आणि खेळपट्टी ओळखण्यात भारत उजवा ठरला.

या कसोटीत पडलेल्या 30 पैकी 21 बळी जे सरळ चेंडूवर पडलेत याचा विचार केला तर इंग्लिश फलंदाजांनी नाणेफेक जिंकल्यावर मनात हे ठसवायला पाहिजे होते की, खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल तरी सामन्याच्या पहिल्या दिवशी चेंडू इतका वळणार नाही. इंग्लिश फलंदाजांची मानसिकता मात्र ते चेन्नई कसोटीत पाचव्या दिवशी खेळत आहेत अशीच होती. यामुळे वरकरणी गावस्कर यांचे मत पटते; पण सरळ चेंडू इतका घातक का ठरला? अक्षर पटेलचा आर्मर चेंडू हा वासिम आक्रमच्या यॉर्करइतका परिणामी असतो की त्याला अजिंक्य रहाणेने ‘वासिमभाई’ हे टोपणनाव ठेवले. या कसोटीत ‘आर्मर’ हेच त्याचे इंग्लिश फलंदाजांविरुद्धचे ‘आरमार’ होते आणि त्यात तो प्रचंड यशस्वी ठरला.

खेळपट्टी खरोखरच तितकी धोकादायक नव्हती. तेव्हा सामनाधिकारी जवागल श्रीनाथ खेळपट्टीवर शेरे द्यायची शक्यता कमी आहे. वास्तविक, क्रिकेट हा खेळ मुळातच रंगतदार आहे. या खेळाला रंगीत कपड्यात, पांढर्‍या चेंडूत आणून आपण अजून रंगतदार केले. आता मात्र आयसीसीचा हा गुलाबी चेंडूचा अट्टाहास रंगाचा बेरंग तर करीत आहेच.

Back to top button