ब्रिटिश मीडिया संतापला | पुढारी | पुढारी

ब्रिटिश मीडिया संतापला | पुढारी

लंडन : वृत्तसंस्था

भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या गुलाबी चेंडूवरील डे-नाईट सामन्यात दोन दिवसांत लोटांगण घातलेल्या इंग्लंड संघाला ब्रिटिश मीडियाने फैलावर घेतले असून, या अपमानास्पद पराभवाला फलंदाजांचे अयशस्वी तंत्र आणि मंडळाची रोटेशन पॉलिसी याला त्यांनी जबाबदार धरले आहे. याचबरोबर खेळपट्टीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुरुवारी संपलेल्या तिसर्‍या सामन्यात भारताने इंग्लंडला दहा विकेटस्नी हरवले होते. यामुळे इंग्लंड मालिकेत 1-2 ने पिछाडीवर गेला आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे त्यांचे स्वप्नही भंग पावले. ‘द टेलिग्राफ’मधील एका स्तंभात स्टेडियमवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

‘द गार्डियन’ने लिहिले आहे की, भारताविरुद्धच्या पराभवाबद्दल कोणाला जबाबदार ठरवावे, या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे, कारण अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. क्रिकेट मंडळाच्या रोटेशन पॉलिसीवरही या वृत्तात टीका करण्यात आली आहे. महत्त्वाच्या मालिकेदरम्यान संघातील प्रमुख खेळाडूंना बाहेर बसवणे कितपत योग्य आहे, असा सवालही करण्यात आला आहे. चेन्नईतील पराभवाचा ‘हँगओव्हर’ या शीर्षकाच्या स्तंभात म्हटले आहे की, पहिल्या डावात 2 बाद 74 धावा असताना फलंदाजांनी आत्मघात केला. रोटेशनच्या नावाखाली कमी गुणवत्ता असलेल्या, फिरकीला खेळण्याचा अनुभव नसलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली. 

‘द सन’मध्ये डेव्ह कीड यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की, अहमदबादच्या ‘टर्निंग पिच’वर इंग्लंड 1 फिरकी गोेलंदाज आणि चार अकराव्या नंबरचे फलंदाज घेऊन खेळला. विस्डेनने म्हटले आहे की, या देशाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लिश क्रिकेट कधीही इतके खराब वाटले नव्हते. 

काही दैनिकांनी इंग्लिश संघाच्या पराभवाला खेळाडूंइतकेच मोतेराच्या खेळपट्टीला जबाबदार धरले आहे. ‘द मिरर’मधील आपल्या कॉलममध्ये अँडी बन यांनी म्हटले आहे की, भारत खेळ भावनेच्या मर्यादा ओलांडण्याच्या जवळ पोहोचला आहे. हे कसोटी क्रिकेट नाही. होम कंडिशनचा फायदा उठवणे योग्य आहे. परंतु, ही खेळपट्टी पाच दिवसांच्या सामन्यासाठी योग्य नव्हती. या खेळपट्टीमुळे इंग्लंड जवळपास 90 वर्षांनी इतक्या कमी वेळेत भारतात पराभूत झाला. 

स्टेडियमवर बंदी घाला : द टेलिग्राफ

क्रिकेट लेखक सिल्ड बॅरी यांच्या ‘द टेलिग्राफ’मधील लेखात म्हणतात, ही खेळपट्टी कसोटीसाठी अनफिट होती. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील भारताचे गुण कमी करायला हवेत. असले दर्जाहीन खेळपट्टी तयार केल्याबद्दल नरेंद्र मोदी स्टेडियमवर बंदी घालायला हवी, अशी मागणीही बॅरी यांनी केली. पण, मला वाटत नाही, की आयसीसी इतके धाडस करेल. कारण या मैदानाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.

कोण काय म्हणाले…

रोटेशन पॉलिसीने घात केला : द गार्डियन

 इतिहासातील सर्वात खराब क्रिकेट : द सन

 ही खेळपट्टी कसोटीसाठी योग्य नव्हती : द मिरर

 भारताचे गुण कमी करायला हवेत : द टेलिग्राफ

इंग्लंडच्या पुरुष, महिला खेळाडूंमध्ये ‘ट्विटर वॉर’

दोन दिवसांत इंग्लंडचा संघ पराभूत झाल्याबद्दल इंग्लंड महिला संघाची खेळाडू अलेक्झांड्रा हार्टली हिने टीकेचे ट्विट केले. महिलांचा सामना सुरू होण्याआधी पुरुषांचा कसोटी सामना संपवल्याबद्दल इंग्लंडच्या संघाचे आभार. आता महिला क्रिकेट सामन्याचा आनंद लुटा, असे ट्विट तिने केले. हे ट्विट काही इंग्लिश क्रिकेटपटूंना रूचले नाही. इंग्लंड क्रिकेटपटू रॉरी बर्न्स याने, हे ट्विट खूपच खेदजनक आहे. पुरुष खेळाडू नेहमीच महिलांच्या क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचे कर्तव्य बजावतात, अशा शेलक्या शब्दात तिच्या ट्विटला ‘रिप्लाय’ दिला. तर, इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट याने, असे ट्विट करणे चुकीचे आहे. महिला संघाच्या पराभवानंतर कोणत्याही पुरुष क्रिकेटपटूने असे ट्विट नक्कीच केले नसते, असे ट्विट करीत अलेक्झांड्राला सुनावले.

केविन पीटरसनने सामना संपल्यानंतर हिंदीमध्ये ट्विट केले आहे. तो म्हणतो की, ‘एका सामन्यासाठी अशी खेळपट्टी असेल तर ठीक आहे. जेथे फलंदाजाला कौशल्य आणि संयमाची चाचणी होते; पण अशा प्रकारची खेळपट्टी पुन्हा नसावी. मला वाटतेय सर्व खेळाडूंनाही अशी खेळपट्टी नकोय. खूपच छान इंडिया..!

प्रत्येकी 3-3 डाव खेळवावे : मायकेल वॉन 

कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला. त्यामुळे मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीबद्दल नवा वाद निर्माण झाला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने खेळपट्टीवर टीका केली. आपल्या ट्विटमध्ये वॉन म्हणतो की, अशी खेळपट्टी असेल, तर काय पर्याय असेल हे मी सांगू इच्छितो. दोन्ही संघांना 3-3 डाव खेळण्यास द्यावे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानेही खेळपट्टीवर शंका उपस्थित केल्याबद्दल वॉनने त्याचे आभार मानले.

Back to top button