'शंभरावे' शतक आले पण, सामना गेला! | पुढारी

'शंभरावे' शतक आले पण, सामना गेला!

पुढारी ऑनलाईन डेस्क 

सचिन रमेश तेंडुलकर भारताच्या या दिग्गज फलंदाजाने आजच्याच दिवशी म्हणजे १६ मार्च २०१२ ला आपल्या कारकिर्दीत हेलमेट काढून अखेरची बॅट उंचावली. त्याने बांगला देश विरुद्ध ढाक्यात अखेरचे शतक ठोकले. हे शतक ठोकतानाही त्याने विश्वविक्रम केला. क्रिकेटच्या इतिहासात शंभरावे शतक ठोकण्याची किमया त्याने आजच्याच दिवशी केली. त्याचे हा विश्वविक्रम मोडणे सध्याच्या घडीला तरी एक दिवास्वप्नच आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘शतकांचे शतक आजच्याच दिवशी २०१२ मध्ये मास्टार ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शंभरावे आंतरराष्ट्रीय शतक झळकावून इतिहास रचला.’ असे ट्विट करुन या घटनेला उजाळा दिला. सचिन तेंडुलकरने ४९ एकदिवसीय आणि ५१ कसोटी शकते ठोकली आहेत. 

सचिनने १६ मार्च २०१२ ला ढाक्यातील शेरे बांगाला स्टेडियमवर आशिया कपमध्ये बांगला देश विरुद्ध १३८ चेंडूत आपले शंभरावे शतक साजरे केले. या शतकाच्या जोरावर भारताने २८९ धावा केल्या. पण, बांगलादेशने हे आव्हान चार चेंडू शिल्लक ठेऊन पार करत सामना जिंकला. 

सचिन तेंडुलकर संध्या शंभर शतकांसह जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ७१ शतकांसह दुसऱ्या तर विराट कोहली ७० शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट पाँटिंगला मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे पण, गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला शतक झळकावण्यात सातत्याने अपयश येत आहे. 

Back to top button