INDvsENG : बटलर - बेअरस्टो जोडीने भारताला चारली पराभवाची धूळ | पुढारी

INDvsENG : बटलर - बेअरस्टो जोडीने भारताला चारली पराभवाची धूळ

अहमदाबाद : पुढारी ऑनलाईन 

तिसऱ्या टी – २० सामन्यात इंग्लंडने भारताचा ८ गडी राखून पराभव करत मालिकेत २ – १ अशी आघाडी घेतली. भारताने ठेवलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने जोस बटलर ( ८३ ) आणि जॉनी बेअरस्टोने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ७७ धावांची भागिदारी रचली. इंग्लंडने हे आव्हान १८.२ षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून यझुवेंद्र चहलने आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी १ विकेट घेतली. या विजयाबरोबरच इंग्लंडने मालिकेत आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी १८ तारखेला होणाऱ्या चौथ्या टी – २० सामन्यात भारताला विजय मिळवणे अत्यावश्यक आहे. 

भारताने ठेवलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सावध सुरुवातीनंतर आक्रमक फलंदाजी केली. सलामीवीर जोस बटलरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. पण, यझुवेंद्र चहलने सावध फलंदाजी करणाऱ्या जेसन रॉयला बाद करुन इंग्लंडला पहिला धक्का दिला. पण, याच्या इंग्लंडच्या आक्रमकतेवर कोणताही परिणाम झाला नाही. बटलरने तुफान फटकेबाजी करत सहाव्या षटकात इंग्लंडचे अर्धशतक धावफलकावर लावले. 

दरम्यान, जोस बटलरने  चेंडूत २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या अर्धशतकामुळे पहिल्या १० षटकातच इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली. पण, कर्णधार विराट कोहलीने भागिदारी तोडण्यात हातखंडा असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी करण्यास पाचारण केले. त्यानेही कर्णधाराला निराश न करता १८ धावा करणाऱ्या डेविड मलानला बाद करुन इंग्लंडला दुसरा धक्का दिला. मलान बाद झाल्यानंतरही इंग्लंडच्या धावगतीवर कोणताही परिणाम झाला नाही. जोस बटलरने आपली फटकेबाजी सुरुच ठेवत १२ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. 

बटलर आणि बेअरस्टोने तिसऱ्या विकेटसाठी भागिदारी रचत इंग्लंडला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ७८ धावांवर खेळणाऱ्या बटलरला कोहलीने चहलच्या गोलंदाजीवर जीवनदान दिले. त्यानंतर चहलनेही बेअरस्टोचा झेल सोडत भारताने सामना गमावल्याचेच संकेत दिले. जीवनदान मिळालेल्या बेअरस्टोने स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडला विजयाच्या जवळ आणून ठेवले. त्याने १९ वे षटक टाकणाऱ्या ठाकूरला सलग दोन चौकार मारत इंग्लंडला सामना ८ विकेट राखून जिंकून दिला. बटलर आणि बेअरस्टोने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ७७ धावांची भागिदारी रचली. बटलरने नाबाद ८३ तर बेअरस्टोने नाबाद ४० धावा केल्या. 

तत्पूर्वी, इंग्लंडने तिसऱ्या टी – २० सामन्यात प्रथम गोलंदाजी करत भारताची वरची फळी कापून काढली. विश्रांतीनंतर संघात पुनरागमन करणारा रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरुवात केली. पण, तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळालेल्या मार्क वूडने राहुलला भोपळाही फोडण्याची संधी न देता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुलचा हा या मालिकेतला सलग दुसरा भोपळा आहे. 

मार्क वूडने राहुल पाठोपाठ रोहितचीही ( १५ ) शिकार करत भारताचे दोन्ही सलामीवीर अवघ्या २० धावात माघारी धाडले. त्यानंतर गेल्या सामन्यातील अर्धशतकवीर इशान किशनला ख्रिस जॉर्डनने ४ धावांवर बाद करत भारताची अवस्था ३ बाद २४ अशी केली. भारताची वरची फळी ढेपाळल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी चौथ्या विकेसाठी ४० धावांची भागिदारी रचली. पण, एक चोरटी धाव घेण्याच्या नादात पंत २५ धावांवर धावबाद झाला. 

पंत बाद झाल्यानंतर विराट कोहलीने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. पण, इंग्लंडच्या प्रभावी माऱ्यामुळे त्याला मोठे फटके खेळण्यात अडचण येत होती. त्यातच श्रेयस अय्यरने ९ धावांची भर घालून त्याची साथ सोडली. अय्यर बाद झाल्यानंतर अखेरची पाच षटके शिल्लक असताना हार्दिक पांड्या फलंदाजी करण्यास आला. दरम्यान, सेट झालेल्या विराट कोहलीने आपली धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. 

१६ व्या षटकात भारताने आपल्या शंभर धावा पूर्ण केल्या. अखेरची ४ षटकेच राहिली असल्याने भारतासमोर आता आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचे आव्हान होते. विराटने हे आव्हान आपल्या शिरावर घेत मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. गिअर बदललेल्या कोहलीने षटकार आणि चौकारांची बरसात करत भारताला फायटिंग टोटल पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. पण, दुसऱ्या बाजूने हार्दिक पांड्याला फटकेबाजी करण्यात अपयश येत होते.

अखेर पांड्याने अखेरच्या षटकात आपले हात खोलले आणि षटकाची सुरुवातच षटकाराने केली. विराटनेही अंतिम षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत भारताला १५० च्या पार पोहचवले. पण, अखेरच्या चेंडूवर पांड्या झेलबाद झाला आणि भारताचा डाव १५६ धावांवर संपुष्टात आला. विराट कोहलीने ४६ चेंडूत नाबाद ७७ धावा केल्या. हार्दिकने १७ धावा केल्या. 

Back to top button