केकेआरचा रसेल मोदींचे का मानतोय आभार?  | पुढारी

केकेआरचा रसेल मोदींचे का मानतोय आभार? 

पुढारी ऑनलाईन डेस्क 

कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळणारा वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेलने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक व्हिडिओ शेअर करुन आभार मानले. त्याने ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आणि भारतीय उच्चायुक्तालयाचे खूप खूप आभार मानतो. लस जमैकात पोहचली आहे आणि आम्ही खूप उत्साहित आहोत. मला जग पूर्वपदावर आलेलं पहायला आवडेल. जमैकातील लोक याचे स्वागतच करतील. आता आपण फक्त जवळचे नाही तर भारत आणि जमैका आता बुंधू आहेत.’ अशी प्रतिक्रिया दिली. त्याने हा व्हिडिओ बुधावारी इंडिया इन जमैकाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट केला आहे. 

५० हजार कोरोना लसीचे डोस पाठवले म्हणून फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी जमैकाने भारताचे आभार मानले होते. जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यु होलनेस यांनी ट्विट करुन ‘मला सांगण्यास अत्यानंद होत आहे की आताच भारताने पाठवलेले ॲस्ट्रा झेनेका कोरोना लसीचे पहिले ५० हजार डोस पोहचले आहेत. आम्ही सरकार आणि भारतीय लोकांचे सहाय्य केल्याबद्दल आभार मानत आहोत.’ अशा आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

भारताच्या लस मैत्री उपक्रमाद्वारे ८ मार्चला भारतात तयार झालेली लस जमैकात पोहचली होती. गेल्या आठवड्यात वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर व्हीव रिचर्डस, रिची रिचर्ड्सन, जेमी अॅडम्स आणि रामनरेश सारवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कॅरेबियन देशांना लस मैत्री अंतर्गत मोफत कोरोना लस पुरवली म्हणून आभार मानले होते. मार्च महिन्यात अँटिग्वा आणि बारबुडा यांना १ लाख ७५ हजार कोरोना लसीचे डोस पोहचले. यातील ४० हजार डोस हे भारताने दिले आहेत. 

Back to top button