PBKSvsSRH : हैदराबादचा पहिला विजय | पुढारी

PBKSvsSRH : हैदराबादचा पहिला विजय

चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचे १२१ धावांचे आव्हन १८.४ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात पार करत हंगामातील आपला पहिला विजय साकारला. हैदराबादकडून सलामीवीर जॉनी बेअरस्टोने नाबाद ६३ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ३७ धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, हैदराबादच्या खलील अहमद ( २१ धावा ३ बळी ) आणि अभिषेक शर्मा ( २४ धावात २ बळी ) यांच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबचा डाव १२० धावात संपुष्टात आला. पंजाबकडून खाहरुख खान आणि मयांक अग्रवाल यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या.

पंजाब किंग्जचे १२१ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने दमदार सुरुवात करत ५ षटकात बिनबाद ४० धावा केला. यात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या जोनी बेअरस्टोच्या २६ धावांचा तर सावध फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या १३ धावांचा समावेश होता. दरम्यान, सावध खेळणाऱ्या वॉर्नरनेही आपल्या धावांची गती वाढवली. या सलामी जोडीने हैदराबादला ६ षटकात ६० धावांची सलामी दिली. 

पॉवर प्लेनंतर दोघा सलमीवीरांनी धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी १० षटकात ७३ धावांपर्यंत मजल मारली. हे दोघेच पंजाबचे १२१ धावांचे आव्हान बिनबाद पार करतील असे वाटत असतानाच फॅबियन अॅलनने डेव्हिड वॉर्नरला ३७ धावांवर बाद केले. वॉर्नर बाद झाल्यानंतर बेअरस्टोने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत १६ व्या षटकात १०० धावांपर्यंत मजल मारून दिली. दरम्यान, जॉनी बेअरस्टो आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने ४८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या जोडीला आलेल्या केन विल्यमसननेही बॉल टू रन रणनिती अवलंबत बेअरस्टोला चांगली साथ दिली. 

या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागिदारी रचत हैदराबादचा पहिला विजय साकार केला. बेअरस्टोने नाबाद ६३ तर केन विल्यमसनने नाबाद १६ धावा केल्या. 

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये आज ( दि. २१ ) पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होत आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला नाही. पंजाबचा कर्णधार केएल राहुल अवघ्या ४ धावा करुन माघारी परतला. त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. कर्णधार बाद झाल्यानंतर मयांक अग्रवाल आणि ख्रिस गेल यांनी भागिदारी रचण्यास सुरुवात केली. पण, खलील अहमदने अग्रवालला २२ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. अग्रवाल बाद झाल्यानंतर आलेला निकोलस पूरनही पुढच्याच चेंडूवर धावबाद झाला. त्यामुळे पंजाबची अवस्था ३९ धावांवर ३ फलंदाज माघारी परतले. 

अडचणीत सापडलेल्या पंजाबला तारण्याची सर्व जबाबदारी आता ख्रिस गेलवर आली होती पण, राशीद खानने त्याला १५ धावांवर बाद करत पंजाबला चौथा धक्का दिला. पाठोपाठ दीपक हुड्डाही १३ धावांची भर घालून माघारी परतला. त्याला अभिषेक शर्माने बाद केले. त्यामुळे पंजाबची अवस्था ५ बाद ६३ अशी झाली. दरम्यान, मोजेस हेन्रीकेज आणि शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, या जोडीलाही हैदराबादला शंभरी गाठून देता आली नाही. अभिषेक शर्माने हेन्रीकेजला १४ धावांवर बाद केले.

दरम्यान, शाहरुख खानने एकाकी झुंज देत पंजाबला १७ व्या षटकात शंभरी पार करुन दिली. पण, दुसऱ्या बाजूने विकेट पडण्याचा सिलसिला सुरुच राहिला. खलीलने फॅबियन अॅलनला ६ धावांवर बाद करत पंजाबला ७ वा धक्का दिला. दुसऱ्या बाजूने चिवट फलंदाजी करत १७ चेंडूत २२ धावांची खेळी करणारा शाहरुख खानही अखेरच्या षटकात धावगती वाढवण्याच्या नादात खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानतंर अश्विन मुर्गनही ९ धावांची भर घालून माघारी परतला. पाठोपाठ मोहम्मद शामही ३ धावांवर धावबाद झाला. याचबरोबर पंजाब किंग्जचा संपूर्ण संघ १२० धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचला. हैदराबादकडून खलील अहमदने प्रभावी मारा करत २१ धावात ३ तर अभिषेक शर्माने २४ धावात २ फलंदाज टिपले. 

Back to top button