IPL : अखेर तिची कोमेजलेली ‘कळी’ खुलली! तीन पराभवानंतर चेहऱ्यावर उमटले स्मितहास्य | पुढारी

IPL : अखेर तिची कोमेजलेली 'कळी' खुलली! तीन पराभवानंतर चेहऱ्यावर उमटले स्मितहास्य

चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला. हैदराबादने पंजाब किंग्जचा ९ विकेट्सनी पराभव केला. हैदराबादने आपला हंगाम सलग तीन पराभवांनी सुरु केला होता. पण, अखेर हैदराबादने आपली गाडी विजयी ट्रॅकवर आणली. या पहिल्या विजयानंतर हैदराबादची पाठाराखी काव्या मारनच्या चेहऱ्याची कळी खुलली. 

यंदाच्या हंगामात हैदराबादच्या पराभवापेक्षा सनरायजर्सची मालकीण काव्या मारन हिच्या चेहऱ्यावरच्या हावभावांचीच चर्चा जास्त झाली. त्यातच तिच्या संघाने पहिल्या तीन सामन्यात तिला हसण्याची संधीच दिली नव्हती. अखेर आज पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना जिंकून हैदराबादने आपल्या सच्च्या ‘फॅन’ला आपली कळी खुलवण्याची संधी दिली.  सध्या काव्या मारनचा कळी खुललेला चेहरा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्जचे १२१ धावांचे आव्हन १८.४ षटकात एका गड्याच्या मोबदल्यात पार करत हंगामातील आपला पहिला विजय साकारला. हैदराबादकडून सलामीवीर जॉनी बेअरस्टोने नाबाद ६३ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ३७ धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, हैदराबादच्या खलील अहमद ( २१ धावा ३ बळी) आणि अभिषेक शर्मा (२४ धावात २ बळी ) यांच्या भेदक माऱ्यासमोर पंजाबचा डाव १२० धावात संपुष्टात आला. पंजाबकडून खाहरुख खान आणि मयांक अग्रवाल यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या.

Back to top button