CSKvsKKR : तोडफोड क्लायमेक्स नंतरही केकेआरचा पिक्चर पडला | पुढारी

CSKvsKKR : तोडफोड क्लायमेक्स नंतरही केकेआरचा पिक्चर पडला

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

चेन्नई सुपर किंग्जचे २२१ धावांचे आव्हान पार करताना कोलकाता नाईट रायडर्सचे पहिले पाच फलंदाज दुहेरी आकडाही पार करु शकले नाहीत. पण, केकेआरने अभी तो पिक्चर अभी बाकी हैं म्हणत आपल्या डावाच्या उत्तरार्धात जोरदार मुसंडी मारली. पॅट कमिन्सच्या ३४ चेंडूत नाबाद ६६ धावांच्या तडाखेबाज खेळीमुळे सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत रंगत आली. मधल्या फळीतील आंद्रे रसेलने २२ चेंडूत ५४ तर दिनेश कार्तिकने २४ चेंडूत ४० धावा चोपल्या. पण, अखेर केकेआचा संपूर्ण संघ २०२ धावात ऑल आऊट झाला. केकेआरच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सामन्याच्या क्लायमेक्सवर वर्चस्व गाजवले पण, अखेर सीएसकेने त्यांचा १८ धावांनी पिक्चर पाडला. सीएसके कडून ड्युप्लेसिसने ६० चेंडूत धडाकेबाज ९५ धावा केल्या. त्याला सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ४२ चेंडूत ६४ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी ११५ धावांची सलामी दिली. 

चेन्नई सुपर किंग्जचे २२१ धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पहिल्याच षटकात शुभमन गिलला शुन्यावर बाद करत केकेआरला पहिला धक्का दिला. त्यानंतर नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी केकेआरचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला पण, टिच्चून मारा करणाऱ्या दीपक चहरने राणाला ९ धावांवर बाद करत दुसरा सलामीवीरही पॅव्हेलियनमध्ये धाडला. 

धोनीने चांगला स्विंग करत असलेल्या दीपकचा पहिला स्पेल लांबवला. धोनीचा हा निर्णय दीपकने योग्य ठरवत केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनला ७ धावांवर बाद केले. दीपकने त्याच षटकाच्या अखेरच्या सुनिल नारायणलाही ४ धावांवर बाद करत आपला चौथा बळी टिपला. दीपकच्या या भेदक माऱ्यासमोर केकेआरची अवस्था ५ षटकात ४ बाद ३१ धावा अशी झाली. पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात एन्गिडीनेही चहरच्या पावलावर पाऊल टाकत राहुल त्रिपाठीला ८ धावांवर बाद केले. त्यामुळे केकेआरचा ३१ धावात निम्मा संघ माघारी गेला. 

पण, निम्मा संघ माघारी गेल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकने आणि आंद्रे रसेलने तुफान फटकेबाजी करत बॅकफूटला गेलेल्या केकेआरची गाडी रुळावर आणली. या दोघांनी ११ व्या षटकात केकेआरचे शतक धावफलकावर लावले. आंद्रे रसेलने २१ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक ठोकले. पण, केकेआरचा कमबॅकचा आनंद फार काळ टिकला नाही. सॅम करनने रसेलचा ५४ धावांवर त्रिफळा उडवून दिला. 

दरम्यान, दुसऱ्या बाजूने दिनेश कार्तिकने आक्रमक पवित्रा घेत केकेआरला १३ षटकात १२८ धावांपर्यंत पोहचवले. पण, त्यालाही शेवटपर्यंत खिंड लढवता आली नाही. तो २४ चेंडूत ४० धावा करुन एन्गिडीच्या गोलंदाजीवर बाद झाला. कार्तिक बाद झाल्यानंतर पॅट कमिन्सने आपला दानपट्टा फिरवत सॅम करन टाकत असलेल्या १६ व्या षटकात ४ षटकार आणि १ चौकार मारत ३० धावा चोपून काढल्या. आता केकेआरला विजयसाठीचे  २४ चेंडूत ४५ धावांची गरज होती. पण, कमिन्सला साथ देण्यासाठी आलेला नागरकोटी शुन्यावर बाद झाला. 

दरम्यान, कमिन्सने आपले अर्धशतक २३ चेंडूत पूर्ण केले. त्याने केकेआरला १८ षटकात १९३ धावांपर्यंत पोहचवले. आता केकेआर समोर १२ चेंडूत २८ धावांचे आव्हान होते. करन टाकत असलेल्या १९ व्या षटकात पहिल्या चेंडूवर कमिन्सला एकही धाव करता आली नाही. पण, कमिन्सने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. पण, तिसऱ्या चेंडूवर चक्रवर्ती धावबाद झाला. त्यामुळे या चेंडूवर केकेआरला १ धाव मिळाली. चौथा चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर कमिन्सने पाचव्या चेंडूवर १ धाव घेतली. केकेआरची शेवटची विकेट असताना प्रसिद्धने करनचा अखेरचा चेंडू खेळून काढला. 

आता केकेआर समोर ६ चेंडूत २० धावा करण्याचे आव्हान होते. स्ट्राईकवर कमिन्स होता. अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी शार्दुल ठाकूरवर होती. पण, पहिल्याच चेंडूवर दुसरी धाव घेताना प्रसिद्ध शुन्यावर धावबाद झाला आणि केकेआरचा रोमांचक पाठलाग १८ धावांनी अयशस्वी ठरला. सीएसके कडून चहरने ४ तर एन्गिडीने ३ विकेट घेतल्या. 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने दमदार सुरुवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी चेन्नईला ७ षटकात ६० धावांपर्यंत मजल मारून दिली. ऋतुराज गायकवाडने पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करत ३३ चेंडूत आपले अर्धशतक ठोकले. त्याच्या पाठोपाठ ड्युप्लेसिसही आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. या दोघांनी १२ व्या षटकात चेन्नईचे शतक धावफलकावर लावले. 

अखेर वरुण चक्रवर्तीने कोलकात्याला १३ व्या षटकात पहिले यश मिळवून दिले. त्याने ४२ चेंडूत आक्रमक ६४ धावांची खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला बाद केले. दरम्यान, ड्युप्लेसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले. ड्युप्लेसिस आणि मोईन अली यांनी १६ व्या षटकात सीएककेला १५० च्या पार पोहचवले. अखेरची काही षटके राहिली असल्याने मोईन अली आणि ड्युप्लेसिसने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण, सुनिल नारयणने त्याला २५ धावांवर बाद करत चेन्नईला दुसरा धक्का दिला. 

मोईन अली बाद झाल्यानंतर धोनी क्रिजवर आला. त्याने अडखळत्या सुरुवातीनंतर अखेर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली. त्याने आणि ड्युप्लेसिसने सीएसकेला १८ व्या षटकात १८६ धावांपर्यंत पोहचवले. अखेरची दोन षटके राहिली असताना ड्युप्लेसिसने रसेलला सलग तीन चौकार मारत चेन्नईला २०० पार पोहचवले. पण, रसेलने आपल्या अखेरच्या चेंडूवर ८ चेंडूत १७ धावा करणाऱ्या धोनीला बाद केले. 

पण, अखेरच्या षटकात शतकाच्या जवळ पोहचलेल्या फाफ ड्युप्लेसिसने पॅट कमिन्सच्या दुसऱ्या चेंडूवर आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारले. आता ड्युप्लेसिसला शतकासाठी २ चेंडूत ६ धावांची गरज होती. पण, त्याला १ धावच करता आली. अखेरच्या चेंडूवर रविंद्र जडेजाने षटकार मारत चेन्नईला २२० धावांपर्यंत पोहचवले. 

Back to top button