RRvsKKR : राजस्थान सरकली दोन घर पुढे | पुढारी

RRvsKKR : राजस्थान सरकली दोन घर पुढे

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सचे १३४ धावांचे आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात पार करत गुणतालिकतले आपले तळातील स्थान सोडले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने संयमी आणि सेन्सेबल इनिंग खेळत ४१ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. त्याला डेव्हिड मिलरने २४ धावा करत शेवटपर्यंत साथ दिली. शिवम दुबे आणि यशस्वी जैसवाल यांनीही प्रत्येकी २२ धावा करत राजस्थानच्या विजयात आपला हातभार लावला. केकेआरकडून वरुण चक्रवर्तीने ३२ धावात २ विकेट घेतल्या. राजस्थानने हंगामातील आपला दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत ४ गुणांसह सहावे स्थान मिळवले आहे. तर ५ पैकी ४ पराभव पदरात पडलेला केकेआर गुणतालिकेत तळात पोहचला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचे १३४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. हंगामात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या यशस्वी जैसवालने आक्रमक फटके मारत पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. पण, दुसरा सलामीवीर जोस बटलर ५ धावा करुन वरुण चक्रवर्तीची शिकार बनला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसन आणि जैसवालने भागीदारी रचण्यास सुरुवात केली. पण, शिवम मावीने १७ चेंडूत २२ धावा करणाऱ्या जैसवालला बाद करुन राजस्थानला पॉवर प्लेमध्येच दुसरा धक्का दिला. 

या दोन धक्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबेने डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी राजस्थानला १० षटकात ८० धावांवर पोहचवले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागिदारी रचली. पण, वरुण चक्रवर्तीने ११ व्या षटकात २२ धावांवर खेळणाऱ्या शिवम दुबेला बाद करत ही जोडी फोडली. 

दुबे बाद झाल्यानंतर संजूने तेवातियाच्या साथीने १४ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. पण, सॅमसनला तेवातियाची साथ फार काळ मिळाली नाही. तेवातियाला प्रसिद्ध कृष्णाने ५ धावांवर बाद केले. तेवातिया बाद झाल्यानंतर राजस्थानची धावगती थोडी मंदावली. आता राजस्थानला विजयासाठी अखेरच्या ५ षटकात ३० धावांची गरज होती. 

संजू सॅमसन आणि डेव्हिड मिलरने धावा आणि चेंडू यातील अंतर कमी करत सामना आवाक्यात आणण्यास सुरुवात केली. या दोघांनी अतिरिक्त जोखिम न घेता खराब चेंडूवर चौकार मारत धावगती वाढवली. अखेर राजस्थानने केकेआरचे १३४ धावांचे आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात १८.५ षटकात पार करत सामना ६ विकेट्सनी जिंकला.

तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. सलामीवीर नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी पॉवर प्लेमध्ये संथ फलंदाजी केली. दरम्यान, गिल ११ धावा करुन धावबाद झाला आणि केकेआरला पहिला धक्का बसला. जम बसल्यानंतर नितीश राणाने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली पण, साकरियाने त्याला २२ धावांवर बाद करत केकेआरचा दुसरा सलामीवीर बाद केला. 

केकेआरचे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठी आणि सुनिल नारायण यांनी ९ व्या षटकात संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. पण, राजस्थानच्या उनाडकटने सुनिल नारायणला ६ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नारायण बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने केकेआरची धावगती वाढवण्यास सुरुवात केली पण, केकेआरचा कर्णधार आणि त्रिपाठीमध्ये धाव घेताना गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचा फायदा मॉरिसने उचलत मॉर्गनला शुन्यावर धावबाद केले. 

मॉर्गन बाद झाल्यानंतर त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकने केकेआरला १६ व्या षटकात शतकाच्या जवळ पोहचवले. पण, मुस्तफिजूरने २२ चेंडूत ३६ धावांची खेळी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला बाद करत ही जोडी फोडली. त्रिपाठी बाद झाल्यानंतर कार्तिक आणि आंद्रे रसेलने १७ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान, स्लॉग ओव्हर सुरु झाल्या होत्या. त्यामुळे रसेलने आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली पण, १८ वे षटक टाकणाऱ्या मॉरिसला षटकार मारण्याच्या नादात तो ९ धावांवर बाद झाला. मॉरिसने आपल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर केकेआरचा अव्वल फलंदाज दिनेश कार्तिकलाही ( २४ चेंडूत २५ धावा ) बाद करुन सातवा धक्का दिला. 

अखेरची दोन षटके राहिली असताना केकेआरचे दोन्ही चांगले फलंदाज बाद झाल्याने केकेआरची धावगती मंदावली. केकेआरच्या पॅट कमिन्स आणि शिवम मावी यांना १९ व्या षटकात ९ धावाच करता आल्या. पण, २० व्या षटकात कमिन्सने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. हे षटक केकेआरसाठी मोठे षटक ठरणार असे वाटत असतानाच रसेल मॉरिसच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. शेवटचे षटकात टाकणाऱ्या मॉरिसने फक्त ६ धावा देत २ विकेट घेतल्या त्यामुळे केकेआरचा डाव २० षटकात ८ बाद १३३ धावात संपुष्टात आला. 

Back to top button