पूजा रानीला सुवर्ण | पुढारी | पुढारी

पूजा रानीला सुवर्ण | पुढारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय महिला बॉक्सर्सने दुबई येथे सुरू असलेल्या आशियाई पुरुष आणि महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पूजा रानीने 75 किलो वजनी गटात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तर, एम. सी. मेरी कोम, लालबुतसाही आणि अनुपमा यांना पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पूजाने उझबेकिस्तानच्या मावलूदा मोलदोनोवाला एकतर्फी झालेल्या लढतीत पराभूत करीत सुवर्ण कामगिरी केली. 2019 मध्ये जेतेपद मिळवणार्‍या पूजाने मोलदोनोवाला 5-0 असे नमविले. हरियाणाच्या या बॉक्सरचे हे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये चौथे आणि सलग दुसरे सुवर्णपदक आहे. त्यापूर्वी मेरी कोमला सहावे सुवर्णपदक मिळवण्यात अपयश आले. तिला 51 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जागतिक चॅम्पियन नाजिम काजैबेकडून 3-2 असे चुरशीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले. तर, लालबुतसाहीला 64 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या मिलाना साफरोनोवाकडून पराभूत व्हावे लागले.

81 किलो हून अधिकच्या वजनी गटात भारताच्या अनुपमाला कझाकिस्तानच्या लाज्जत कुंगाबेयेवोकडून पराभवाचा सामना करावा लागला. आठ भारतीय बॉक्सर सिमरनजित कौर (60 किलो), विकास कृष्ण (69 किलो), लवलीना बोरगोहेन (69 किलो), जास्मिन (57 किलो), साक्षी चौधरी (64 किलो), मोनिका (48 किलो), स्विटी (81 किलो) आणि वरिंदर सिंह (60 किलो) यांना उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. या सर्वांनी देशासाठी कांस्यपदक मिळवले. 

 

Back to top button