KKR vs SRH: हैदराबादची शरणागती | पुढारी

KKR vs SRH: हैदराबादची शरणागती

मुंबई ; वृत्तसंस्था : भेदक गोलंदाजी आणि कडक फलंदाजी यांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR vs SRH) शनिवारी सनरायझर्स हैदराबाद संघाचा 54 धावांनी धुव्वा उडवून सफाईदार विजय नोंदवला. त्याचबरोबर त्यांनी प्ले ऑफमधील प्रवेशाच्या आपल्या आशांना आणखी बळ दिले. आता त्यांचे तेरा सामन्यांतून 12 गुण झाले आहेत.

हैदराबादला या सामन्यात जय मिळवणे आवश्यक होते. तथापि, त्यांना सातवा पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांची मोठी पीछेहाट झाली आहे. तूर्त बारा सामन्यांतून त्यांचे 10 गुण झाले आहेत. विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या हैदराबादला 20 षटकांत 8 गडी गमावून 123 धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार केन विलियम्सनला 9 धावांवर आंद्रे रसेलने त्रिफळाबाद केले.

अभिषेक शर्मा (43) आणि एडन मार्कराम (32) यांचा अपवाद वगळता हैदराबादच्या सर्व फलंदाजांनी कोलकाताच्या तोफखान्यापुढे नांगी टाकली.राहुल त्रिपाठीने 9 धावा करून तर निकोलस पूरनने 2 धावा केल्यानंतर तंबूचा रस्ता धरला. बिनीचे फलंदाज बाद झाल्यानंतर हैदराबादचा पराभव म्हणजे केवळ औपचारिकता उरली होती. मधल्या फळीचे दारुण अपयश हेच हैदराबादच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. आता त्यांना प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणे अतिशय कठीण बनले आहे. कारण त्यांचे अजून दोनच सामने उरले आहेत.

कोलकाताकडून उमेश यादवने 4 षटकांत 19, सुनील नारायणने 34 तर वरुण चक्रवर्तीने 25 धावा मोजल्या. या तिघांनीही प्रत्येकी एक गडी टिपला. टिम साऊथीने केवळ 23 धावांच्या मोबदल्यात 2 मोहरे गारद केले. सर्वात कमाल केली ती अष्टपैलू आंद्रे रसेलने. त्याने 4 षटकांत अवघ्या 22 धावा मोजून 3 बळी मिळवले. (KKR vs SRH)

त्यापूर्वी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. त्यांनी निर्धारित 20 षटकांत 6 बाद 177 धावा चोपल्या. त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर व्यंकटेश अय्यर याला 7 धावांवर मार्को जॉन्सन याने त्रिफळाबाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि नितीश राणा यांनी आक्रमक फलंदाजी केली. टी. नटराजनच्या एकाच षटकात त्यांनी 18 धावा झोडल्या.

त्यानंतर उमरान मलिकला सूर गवसला. त्याने रहाणे (28) आणि राणा (26) या दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. रहाणेने 24 चेंडूंचा सामना करून 3 षटकार खेचले. राणाने 16 चेंडू खेळून 1 चौकार व 3 षटकार लगावले. पाठोपाठ कर्णधार श्रेयस हाही उमरान मलिकचा बळी ठरला. 9 चेंडूंत त्याने 2 चौकारांसह 15 धावांची खेळी केली. 10 षटकांचा खेळ संपला तेव्हा कोलकाताने 4 गडी गमावून 84 धावा केल्या होत्या.

त्यानंतर एका वादग्रस्त निर्णयावर रिंकू सिंग पायचीत होऊन तंबूूत परतला. त्याने 5 धावा केल्या. टी. नटराजनने त्याला बाद केले. सॅम बिलिंग्ज व आंद्रे रसेल यांनी मग चांगली फलंदाजी केली. बिलिंग्जने 34 धावांची चटपटीत खेळी करताना 3 चौकार व 1 षटकार ठोकला. त्याला भुवनेश्वर कुमारने केन विलियम्सनकरवी झेलबाद केले.

धावसंख्येला आकार मिळाला तो रसेलमुळे. त्याने नाबाद 49 धावा कुटल्या. 28 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार ठोकले आणि 4 गगनचुंबी षटकार खेचले. त्यातील दोन षटकार वॉशिंग्टन सुंदरच्या अंतिम षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर त्याने लगावले. हैदराबादकडून उमरान मलिक सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 33 धावांत 3 बळी मिळवले. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि मार्को जान्सन यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.

अष्टपैलू रसेल ठरला विजयाचा शिल्पकार (KKR vs SRH)

या लढतीत 28 चेंडूंत नाबाद 49 धावा झोडलेला आणि आपल्या भेदक गोलंदाजीने केवळ 22 धावांत हैदराबादचे 3 मोहरे तंबूत पाठवणारा आंद्रे रसेल हा कोलकाता संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पंचांचा निर्णय वादाच्या भोवर्‍यात

या सामन्यात रिंकू सिंगबाबत पंचांनी दिलेला पायचीतचा निर्णय वादाच्या भोवर्‍यात सापडला. गोलंदाजी करत असलेल्या टी. नटराजन याने वारंवार दाद मागितल्यानंतर पंचांनी खूप उशिरा रिंकू पायचीत असल्याचा कौल दिला. त्यावर मैदानात असलेला दुसरा फलंदाज सॅम बिलिंग्ज यानेही शंका उपस्थित केली. रिंकू तर पंचांच्या निर्णयावर कमालीचा नाराज दिसला. अखेर संथ पावले टाकत त्याने तंबूची वाट धरली.

Back to top button