जोकोविच अंतिम फेरीत | पुढारी | पुढारी

जोकोविच अंतिम फेरीत | पुढारी

पॅरिस : वृत्तसंस्था

लाल मातीचा बादशहा अशी ख्याती मिळवलेल्या राफेल नदाल याला हरवून जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविचने राफेल नदालचा चार सेटमध्ये पराभव केला. जोकोविचला जेतेपदासाठी आता स्टेफोनोस सिसिपासविरुद्ध भिडावे लागेल. 

विश्‍वविक्रमी 21 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या नदालच्या मोहिमेला जोकोविचने धक्‍का दिला. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना जोकोविचने 3-6, 6-3, 7-6 (7-4), 6-2 असा झुंजार विजय मिळवला. फ्रेंच ओपनच्या इतिहासात तब्बल 14 व्यांदा उपांत्य फेरी गाठलेल्या नदालचा पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पराभव झाला. याआधी त्याने कधीही उपांत्य तसेच अंतिम सामना गमावला नव्हता. त्याचबरोबर फ्रेंच ओपनमध्ये नदालला दोनवेळा नमवणारा जोकोविच पहिला टेनिसपटूही ठरला. तब्बल 4 तास 11 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात नदालने शानदार सुरुवात केली होती. नदालच्या पहिल्याच सर्व्हिसवर जोकोविचने ब्रेक पॉईंट मिळवला; मात्र हा पॉईंट वाचवत नदालने 5-0 अशी भक्‍कम आघाडी मिळवली. त्यावेळीच जोकोविचचा पराभव होणार असे दिसत होते. मात्र, जोकोविचने यानंतर जो काही खेळ केला त्याने टेनिसप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. 

Back to top button