क्रोएशियाचा धक्कादायक पराभव, इंग्लंडकडून मात | पुढारी

क्रोएशियाचा धक्कादायक पराभव, इंग्लंडकडून मात

लंडन : पुढारी ऑनलाईन 

युरो कप २०२० मध्ये लंडनमधील विम्बले स्टेडियमववर काल (दि. १३) यजमान इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात रंगतदार असा सामना झाला. इंग्लंडने आपल्या आक्रमणाच्या जोरावर क्रोएशियावर १-० गोल फरकाने विजय मिळवला. इंग्लिश स्ट्रायकर्स आणि मिडफिल्डर्सनी सामन्याच्या सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी क्रोएशियावर वर्चस्व गाजवले. आक्रमक खेळाच्या जोरावर त्यांनी सामन्यावरची पकड मजबूत ठेवली. इंग्लंड संघाच्या या विजयानंतर चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

इंग्लंडला घरच्या मैदानावर खेळल्याचा फायदा मिळाला आणि या संधीचे सोने यजमान संघाने केले. त्यांचा संघ कागदावर तगडा दिसत होता. तसाच तगडा खेळ इंग्लिश खेळाडूंनी प्रत्यक्षात करून दाखवला. फुटबॉल प्रेमींची मने जिंकली.

इंग्लंड संघाच्या आक्रमणाची खास जबाबदारी स्टार हॅरी केन याने पार पाडली. २०१८ च्या फुटबॉल विश्वचषकात त्याने ६ गोल केले होते. आणि गोल्डन बूटचा किताबही पटकवला होता. त्याला रहीम स्टर्लिंगने उत्तम साथ दिली. स्टर्लिंगनेच सामन्याच्या ५७ व्या मिनिटात इंग्लंडचा पहिला गोल केला. या गोलच्या जोरावर यजमान संघाने प्रतिस्पर्धी क्रोएशियावर १-० अशी आघाडी मिळवली. 

क्रोएशिया संघाकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. यात लुका मॉड्रीच, इवान पेरिसीच आणि क्रॅमेरीच यासारख्या खेळाडूंनी २०१८ च्या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी साकारली होती. ज्यामुळे क्रोएशिया २०१८ मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहचला होता. पण कालच्या सामन्यान या तीन खेळाडूंच्या खेळाची जादू पहायला मिळाली नाही. क्रोएशिया संघाचे आक्रमण इंग्लिश बचावपटूंनी वेळोवेळी परतावून लावले. क्रोएशियाला एका महत्त्वाच्या खेळाडूची कमततरा जाणल्याचे दिसते. तो खेळाडू म्हणजे इवान राकेटीच. त्याने गेल्याच वर्षी आंतराराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त पत्करली आहे. त्याचं संघात नसणं हे कुठेतरी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात जाणवत होतं. 

लुका मॉड्रीच, इवान पेरिसीच, क्रॅमेरीच आणि इवान राकेटीच या चौघांमुळेच २०१८ मध्ये क्रोएशियाचे आक्रमण एवढे धारदार दिसत होते आणि त्याच जोरावर ते विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचले होते. पण काल झालेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध हा संघ फिका पडला आणि त्यांना पराभावाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे क्रोएशियन चाहते मात्र नाराज झाले. अनेकांना अश्रू अनावर झाले. तर अनेकांनी आपल्या संघाकडून पुढील सामन्यात चांगली कामगीरी होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.

ग्रुप डी मध्ये इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलॅंड आणि चेक रिपब्लिक असे देश आहेत, कालच्या सामन्यावरून इंग्लंड हा पुढील सगळे सामने जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीसाठी सहज पात्र ठरेल असे दिसतं आहे. पण ग्रुप डी मध्ये दुसऱ्या नंबर वर कोण असेल यासाठी पुढील सामने बघावे लागतील.

Back to top button