IPL : प्रसारण हक्‍कांची विक्री करून बीसीसीआय होणार मालामाल | पुढारी

IPL : प्रसारण हक्‍कांची विक्री करून बीसीसीआय होणार मालामाल

मुंबई ; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) प्रसारण हक्‍क विकून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय बक्‍कळ कमाई करणार आहे. 2023 ते 2027 पर्यंत, पाच हंगामांच्या हक्‍कांच्या लिलावातून मंडळ सुमारे 54 हजार कोटी कमावू शकते. इंटरनेट सर्च इंजिन गुगलचे मालक अल्फाबेट इंकनेही आयपीएल (IPL) सामन्यांच्या प्रसारणाचे अधिकार मिळविण्यासाठी बोली लावण्यात स्वारस्य दाखवले आहे. त्यांनी बीसीसीआयकडून बोलीची कागदपत्रे मिळवली आहेत.

दक्षिण आफ्रिकास्थित टेलिव्हिजन चॅनेल समूह सुपरस्पोर्टने देखील कागदपत्रे खरेदी केली आहेत. यापूर्वी, अ‍ॅमेझॉन डॉट कॉम इंक, वॉल्ट डिस्ने कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सोनी ग्रुप कॉर्प, जी एंटरटेन्मेंट एंटरप्राइजेस आणि फँटेसी-स्पोर्टस् प्लॅटफॉर्म ड्रीम-11 यांना बीसीसीआयकडून कागदपत्रे मिळाली होती. बीसीसीआयने 2023-27 साठी प्रसारण हक्‍क विकण्यासाठी 12 जूनपासून लिलाव सुरू करणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2023 ते 2027 या 5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट मंडळाला या लीगच्या प्रसारण अधिकाराच्या बदल्यात 54 हजार कोटी रुपये मिळू शकतात. मंडळाने 2018 ते 2022 पर्यंत हे हक्‍क स्टार इंडियाला 16,347.50 कोटी रुपयांना विकले. स्टार इंडियाची मूळ कंपनी वॉल्ट डिस्ने आहे. ही एक अमेरिकन कंपनी आहे.

गेल्या हंगामात आयपीएलच्या सामन्यांची प्रेक्षकसंख्या होती सुमारे 35 कोटी. भारताव्यतिरिक्‍त, भारतीय उपखंडातील श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि मालदीव या देशांमधील आयपीएलचे प्रसारण हक्‍क स्टार स्पोर्टस् नेटवर्ककडे आहेत. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम्, कन्‍नड आणि बंगाली अशा 7 भाषांमध्ये हे प्रक्षेपण केले जाईल.

मूळ किंमत आहे 32,890 कोटी ((IPL))

बीसीसीआयने चारही बकेटमध्ये एकूण 32,890 कोटी रुपये आधारभूत किंमत निश्‍चित केली आहे. प्रत्येक सामन्यासाठी टेलिव्हिजन हक्‍कांची मूळ किंमत 49 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, एका सामन्याच्या डिजिटल अधिकारांची मूळ किंमत 33 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. 18 सामन्यांच्या क्लस्टरमधील प्रत्येक सामन्याची मूळ किंमत 16 कोटी रुपये आहे.

भारतीय उपखंडाबाहेरील हक्‍कांसाठी प्रत्येक सामन्याची आधारभूत किंमत 3 कोटी रुपये आहे. अशा प्रकारे एकूण रक्‍कम 32,890 रुपये आहे. जादा बोली लागली तर सुमारे 54 हजार कोटी रुपयांची कमाई होईल, असा मंडळाचा अंदाज आहे.

Back to top button