रोनाल्डोची जादू! एकाच सामन्यात ६ विक्रमांची नोंद

लिस्बन : पुढारी ऑनलाईन
सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असणारा पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोने हंगेरीविरुद्ध युरो चषक २०२० च्या पहिल्या सामन्यात २ गोल नोंदवून अनेक विक्रम मोडले.
रोनाल्डो हंगेरीविरुद्ध मैदानात उतरताच सर्वाधिक युरो चषक स्पर्धा खेळणारा फुटबॉलपटू ठरला. २००४ पासून त्याने पाव युरो स्पर्धा गाजवल्या आहेत. रोनाल्डोच्या जादुई खेळाच्या जोरावर पोर्तुगाल संघाने काल (दि. १५) पहिल्या सामन्यात हंगेरीवर ३-० गोलफरकाने मात केली. २०१६ ला रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने युरो कप आपल्या नावावर केला होता.
दरम्यान कालच्या हंगेरी विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोने ६ विक्रम मोडले…
१. यूरो कप स्पर्धेत ५ गोल…
रोनाल्डो हा सलग पाच युरो चषक स्पर्धेत गोल करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. २००४, २००८, २०१२ आणि २०१६ युरो चषक स्पर्धेतही त्याने प्रतिस्पर्धी संघांवर गोल डागले आहेत. रोनाल्डो हा पोर्तुगालचा सर्वाधिक गोल (१०६) करणारा फुटबॉलपटू आहे. गेल्या ४३ आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ४५ गोल केले आहेत.
२. यूरो चषक स्पर्धेत सर्वाधिक गोल…
रोनाल्डो स्पर्धेत ओवरऑल सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनला आहे. त्याने फ्रान्सचा माजी फुटबॉलपटू मायकल प्लातिनीचा विक्रम मोडला. रोनाल्डोने २००४ यूरो चषक स्पर्धेत पोर्तुगाल संघाकडून प्रदार्पण केले. त्याने प्रदार्पणाच्या सामन्यात गोल करून फुटबॉल जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने पाच यूरो चषक स्पर्धेच्या २२ सामन्यांमध्ये ११ गोल डागले आहेत.
३. २+ गोल करणारा तरुण खेळाडू
युरो चषकातील सामन्यात २ किंवा त्याहून अधिक गोल नोंदविणारा रोनाल्डो हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. हंगेरीविरुद्धच्या सामन्याच्या दिवशी रोनाल्डोचे वय ३६ वर्षे १३० दिवस होते. यापूर्वी हा विक्रम युक्रेनच्या आंद्रे श्वेचेन्कोच्या नावावर होता. त्याने २०१२ च्या युरो चषक स्पर्धेत (३५ वर्षे २५६ दिवस) स्वीडनविरुद्ध २ गोल केले होते.
४. मोठ्या स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणार युरोपीयन खेळाडू
एकाद्या मोठ्या स्पर्धेत (विश्वचषक/युरो कप) पोर्तुगालसाठी रोनाल्डोचा हा ३९ वा सामना होता. एका देशासाठी प्रमुख स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा तो युरोपियन खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम जर्मनीच्या बास्टियन श्वेन्स्टीगरकडे होता. त्याने मोठ्या स्पर्धेत जर्मन राष्ट्रीय संघाकडून ३८ सामने खेळले.
५. रोनाल्डोने आतापर्यंत ५ युरो कप खेळले…
आतापर्यंत एकूण १७ खेळाडू ४ वेळा युरो चषक स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय संघाकडून मैदानात उतरले आहेत. यात लोथर मॅथौस आणि पीटर श्मिकल सारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. २०१६ मध्ये रोनाल्डोसह ११ खेळाडू होते, जे चौथ्यांदा या स्पर्धेत सहभागी झाले होते. परंतु त्या खेळाडूंपैकी फक्त रोनाल्डो सध्या आपली पाचवी युरो चषक स्पर्धा खेळत आहे. उर्वरित १० पैकी काही खेळाडू निवृत्त झाले आहेत तर काही जणांचा जायबंदी असल्याने त्यांची राष्ट्रीय संघात निवड झालेली नाही.
६. पोर्तुगालसाठी सर्वच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोल…
रोनाल्डो पोर्तुगालसाठी सर्वच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोल नोंदविणारा पहिला खेळाडू आहे. २००४ च्या युरो चषक स्पर्धेनंतर तो पोर्तुगालकडून ११ मोठ्या स्पर्धांमध्ये खेळला आहे आणि त्याने या सर्व स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचे गोल जाळे भेदले आहे. यात ५ युरो चषक, ४ फिफा वर्ल्ड कप, तर २०१७ चा कॉन्फेडरेशन कप आणि २०१९ ची यूईएफए राष्ट्रीय लीगचा समावेश आहे.