जडेजा, अश्विन दोघेही खेळू शकतात : गावसकर | पुढारी

जडेजा, अश्विन दोघेही खेळू शकतात : गावसकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

साऊथहॅमप्टनच्या गरम वातावरणात न्यूझीलंड विरुद्ध होणार्‍या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघ रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनाही उतरवू शकतो. कारण, खेळपट्टी सुकल्यानंतर स्पिनर्सना मदत मिळेल, असे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी सांगितले. साऊथहॅमप्टनमध्ये गेले काही दिवस खूप गरम होत आहे. त्यामुळे खेळपट्टी सुकून स्पिनर्सना मदत मिळेल त्यामुळे अश्विन व जडेजा दोघेही खेळण्याची शक्यता आहे. अश्विन व जडेजा सोबतच फलंदाजी देखील करतात व गोलंदाजीत समतोल निर्माण करतात. इंग्लंडविरुद्ध नंतर होणार्‍या मालिकेत देखील बर्‍याच गोष्टी वातावरण व खेळपट्टीवर अवलंबून असतील, असे गावस्कर म्हणाले. उद्यापासून सुरू होणार्‍या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताने कोणत्या गोलंदाजांना खेळवावे याबाबत अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.

]गावस्कर म्हणाले की, अश्विन दौर्‍यावर महत्त्वाची भूमिका पार पाडेल. तो एक चांगला गोलंदाज आहे. प्रसन्नाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो फलंदाजांना खराब फटका मारायला लावायचा. हरभजन सिंगकडे दुसरा होता. अश्विनकडे हे सर्व आहे. यामध्ये कॅरम बॉल जोडल्यास तो आणखीन घातक ठरू शकतो. 

फलंदाजीबाबत बोलताना गावसकर म्हणाले की, विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटच्या प्रभावामुळे अनेक वेळा फलंदाज उसळी घेणारा चेंडू खेळण्याच्या चक्करमध्ये पडतो. जेथे चेंडू स्विंग होत नाही तेथे हे चालून जाईल. पण, इंग्लंड येथे चेंडूला चांगली स्विंग मिळते आणि त्यामुळे शरीराजवळ खेळणे गरजेचे आहे. विराट कोहली सपाट खेळपट्टीवर देखील चेंडू येण्याची प्रतीक्षा करतो. त्यामुळे तो कुठल्याही खेळपट्टीवर यशस्वी आहे. इंग्लंड विरुद्ध भारतात झालेल्या मालिकेत तो शतक झळकावू शकला नाही. पण, आपल्या खेळीने फिरकी कसे खेळायचे हे दाखवून दिले.

ऑस्ट्रेलियाच्या ब्रॉड हॉजने मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, इंग्लंडमध्ये कधीही पाऊस पडू शकतो आणि सामन्यादरम्यान पावसाची शक्यता असल्यास भारताने चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाजासह उतरावे. वेगवान गोलंदाजीमध्ये त्याने जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळावे, असे म्हटले आहे, तर फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजाला पसंती दर्शवली आहे.

 

Back to top button