#WTC2021: अंधूक प्रकाशाचा लपंडाव, खेळ पुन्हा थांबला | पुढारी

#WTC2021: अंधूक प्रकाशाचा लपंडाव, खेळ पुन्हा थांबला

साऊथहॅमप्टन; पुढारी ऑनलाईन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी पावसाने उसंत घेतल्यानंतर नाणेफेक झाली. नाणेफेक जिंकणाऱ्या न्यूझीलंडने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी न्यूझीलंडच्या वेगवान तोफखाण्याचा नेटाने सामना केला. या दोघांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. या दोघांनी भारताला अर्धशतकी मजल मारुन दिली.

रोहित शर्माने खराब चेंडूवर आक्रमक फटके मारत धावफलक हालता ठेवला होता. रोहितची आश्वासक सुरुवात पाहून तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच कायल जेमिसनने त्याला ३४ धावांवर बाद केले. रोहित बाद झाला त्यावेळी भारताच्या ६२ धावा झाल्या होत्या. रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिलवर धावफलक हालता ठेवण्याची जबाबदारी आली. पण, वॅगनरने त्याला २८ धावांवर बाद करत भारताला ६३ धावांवर दुसरा धक्का दिला.  

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यावर भारताचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर आली होती. या दोघांनी उपहारापर्यंत किल्ला लढवला. पण, उपहारानंतर सावध फलंदाजी करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला बोल्टने ८ धावांवर माघारी धाडले. शंभरीच्या आत भारताचे तीन शिलेदार माघारी गेल्यानंतर कर्णधार विराटला साथ देण्यासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर आला. या दोघांनी संघाचे शतक धावफलकावर लावले. 

कर्णधार आणि उपकर्णधार भारताचा डाव सावरत असतानाच पंचांनी अंधूक प्रकाशामुळे लवकर चहापानाची घोषणा केली. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी भारताच्या ३ बाद १२० धावा झाल्या होत्या. चहापानानंतर खेळ पुन्हा सुरु झाल्यानंतर या जोडीने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. विराट कोहली चाळीशीमध्ये पोहचला होता तर अजिंक्यही अक्रमक फटके मारत होता. पण, वातावरण पुन्हा ढगाळ झाले आणि प्रकाश कमी झाला. त्यामुळे पुन्हा खेळ थांबवला. खेळ थांबला त्यावेळी ५८.४ षटकात ३ बाद १३४ धावा झाल्या होत्या. विराट नाबाद ४० धावांवर तर अजिंक्य रहाणे नाबाद २२ धावांवर खेळत आहे. 

काही वेळाने खेळ पुन्हा सुरु झाला त्यावेळी विराट आणि अजिंक्य दोघेही चांगल्या लयीत दिसत होते. पण, अवघ्या सहा षटकानंतर पुन्हा अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या ३ बाद १४६ धावा झाल्या होत्या. विराट ४४ तर अजिंक्य २९ धावांवर खेळत होता. बराच वेळ पंचांनी प्रकाशमापकावर स्थिती सुधारली आहे का याची चाचपणी केली. अखेर पंचांनी स्थिती सुधारणार नाही म्हटल्यावर दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. 

अधिक वाचा : WTC Final : पाऊस सुरुच राहिला तर काय? 

 

Back to top button